फुरसुंगी : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद हद्दीतील उरुळी देवाची गावातील काही गोदामांमध्ये अनधिकृतपणे स्क्रॅप प्रोसेसिंगसोबत रात्रीच्या वेळेस प्लास्टिक, रबर, केबल वायर व ई-वेस्टसारखा अत्यंत विषारी कचरा खुलेआम जाळला जात आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धूर पसरत असून, येथील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
हा रबरसदृश्य कचरा जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनास त्रास, डोकेदुखी, मळमळ, उलटी, डोळ्यांची जळजळ अशा तक्रारी वाढल्या आहेत. लहान मुले, वृद्ध व आजारी नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. नागरिकांनी अनेकदा संबंधित स्क्रॅप गोडाऊन चालकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. मंतरवाडी चौक ते हांडेवाडी दरम्यानच्या रस्त्यावरही काही समाजकंटक रात्रीच्या वेळी कचरा रस्त्यालगत टाकून तो जाळून पसार होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात प्रदूषणाचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
केबल वायर जाळून तांबे काढणे हा थेट गुन्हा असून याबाबतची परवानगी फक्त अधिकृत रिसायकल करणाऱ्यांनाच आहे. तसेच, यासाठी अग्निसुरक्षा विभागाची ना हरकत, फायर सेफ्टी साधने व कामगार सुरक्षेचे नियम पाळणे बंधनकारक आहे. मात्र, उरुळी देवाची परिसरातील अनेक स्क्रॅप गोडाऊन व्यावसायिक हे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे हा कचरा जाळत असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून केला जात आहे.
नियमांनुसार स्क्रॅप व्यवसायासाठी औद्योगिक झोनमध्ये जागा, स्थानिक स्वराज्य संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी अनिवार्य असून कोणत्याही प्रकारचा कचरा जाळण्यावर हवा प्रदूषण प्रतिबंध व प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट कायद्याने बंदी असताना देखील या परिसरातील स्क्रॅप व्यावसायिकांकडून या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे आढळून येत आहे.
स्क्रॅप व्यावसायिक विनापरवाना मोठ्या प्रमाणात धोकादायक रबरी, प्लास्टिक कचरा पेटवून येथील रहिवाशांच्या आरोग्याशी खेळत आहेत. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकार थांबवावेत. अन्यथा, येथील रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांवर व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.महेश कोंडे, रहिवासी, उरुळी देवाची