Family Court Pune: तरुण मुलीला वडिलांपेक्षा आईचीच अधिक गरज
पुणे : वयाच्या पन्नाशीत पोहोचलेल्या दाम्पत्यांचा घटस्फोट कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांच्या न्यायालयाने मंजूर केला आहे. पत्नीकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप करत घटस्फोटासह दोन मुलांच्या ताब्याची मागणी पतीने केली. न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मान्य करत घटस्फोट मंजूर केला. मात्र, मुलगा हा सज्ञान आहे तर सतरा वर्षीय मुलीला वडिलांपेक्षा आईची गरज अधिक असल्याचे नमूद करत मुलांच्या ताब्याची मागणी फेटाळून लावली.
अनुज (वय 53) आणि नताशा (वय 51) (नावे बदललेली आहेत) यांचा विवाह 29 डिसेंबर 1996 रोजी झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. लग्नाच्या काही वर्षानंतर तिच्याकडून शारिरीक तसेच मानसिक छळ सुरू झाला. यादरम्यान, तिने स्वत:ला इजा करण्यासह आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचे विवाह्यबाह्य संबंध सुरू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने ॲड. राणी कांबळे- सोनावणे यांमार्फत कौटुंबिक न्यायालयाची पायरी चढत घटस्फोटासह मुलांच्या ताब्याची मागणी केली. न्यायालयाने क्रुरतेच्या आधारावर घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. मात्र, परदेशात शिकत असलेला मुलगा हा 25 वर्षांचा असून सज्ञान आहे.
त्यामुळे, त्याच्या ताब्याचा प्रश्न उद्भवत नाही. तर, मुलगी दहा उत्तीर्ण असून सतरा वर्षांची आहे. तरुण मुलीला वडीलांपेक्षा आईची गरज जास्त असते. त्यामुळे, मुलगी आईसोबत राहण्यामध्येच तिचे भवितव्य साधले जाणार आहे. त्यामुळे, अनुज यास दोन्ही मुलांचा ताबा मागण्याचा अधिकार नसल्याचे नमूद करत कायमस्वरुपी ताबा मिळण्याची मागणी फेटाळून लावली.
न्यायालयाने क्रौर्याच्या आधारावर घटस्फोट मंजूर करून पतीला न्याय दिला आहे. मुलांच्या ताब्याबाबत ‘बालकाचे कल्याण’ हे तत्त्व केंद्रस्थानी ठेवत निर्णय देण्यात आला. न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे. पत्नीपासून होणारा शारीरिक आणि मानसिक त्रासातून पतीची सुटका झाली याचा जास्त आनंद आहे.
ॲड. राणी कांबळे-सोनावणे, पतीच्या वकील.

