

पुणे : 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेचा समारोप उद्या शुक्रवारी (दि. 23 जानेवारी) होणार आहे. शेवटच्या टप्प्यात शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात शुक्रवारी 99 किलोमीटर मार्गावर ही शर्यत होणार आहे.
बालेवाडीतील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुल येथून स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. तेथून पाषाणमार्गे एनसीएल चौक, रक्षक चौक, काळेवाडी फाटा, डांगे चौक, संत तुकाराम महाराज पूल, भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर, तापकीर चौक, काळेवाडी फाटा, आचार्य आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक), सेनापती बापट रस्ता, बालभारती, नळस्टॉप, लक्ष्मीनारायण चौक, शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक), लष्कर परिसर टर्फ क्लब, साधू वासवानी चौक, साखर संकुल हा मार्ग स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आला आहे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे स्पर्धेचा समारोप होणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
बालेवाडीतील राधा चौक ते सूस खिंड रोड , पूनम बेकरी ते पाषाण चौक, पाषाण ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राजीव गांधी पूल, सेनापती बापट रस्ता, पत्रकार भवन ते विधी महाविद्यालय रस्ता, नळस्टॉप ते सेनादत्त पेठ, टिळक चौक ते अप्पा बळवंत चौक, दगडूशेठ हलवाई ते मंडई, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील राष्ट्रभूषण चौक ते ना. सी. फडके चौक, नरपतगिरी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, लष्कर भागातील अर्जुन चौक ते घोरपडी परिसर, लाल महाल चौक ते स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), गरवारे चौक ते जंगली महाराज रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
‘सायकल स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी दुपारी बारा ते चार यादरम्यान करण्यात आले आहे. स्पर्धेचा मार्ग टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. कोणताही रस्ता अर्ध्या तासाहून जास्त वेळ बंद ठेवण्यात येणार नाही. स्पर्धेच्या मार्गावर दुतर्फा वाहने लावण्यास मनाई केली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे स्पर्धेचा समारोप होणार आहे. स्पर्धेच्या काळात शहरात जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा. रुग्णवाहिकांना त्वरित मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्पर्धा मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील रस्ते वाहतुकीस खुले करून दिले जातील, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.
‘पुणे ग््राँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेमुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. परदेशातील सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. नागरिकांनी स्पर्धेकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त