Ujani Rosy Starling Pudhari
पुणे

Ujani Rosy Starling: बायोअंशी तत्त्व! उजनीच्या आकाशात हजारो भोरड्यांची चित्तथरारक ‘मुर्मुरेशन’ हवाई कसरत

युरोपचे पाहुणे उजनीच्या काठावर दाखल! द्राक्ष, डाळिंब पिकांवर उपजीविका; पाहा, पक्षांचा विलोभनीय दिनक्रम

पुढारी वृत्तसेवा

पळसदेव : युरोपातून स्थलांतर करून महाराष्ट्रातील ज्वारी व द्राक्षपिकाऊ प्रदेशांमध्ये विदेशी पाहुणे म्हणून दरवर्षी भोरड्या अर्थात गुलाबी मैना पक्षी उजनी धरणाच्या परिसरात दाखल झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील पळसदेव या गावच्या शिवारात हे पक्षी सध्या मुक्कामाला आहेत. येथे हे पक्षी दररोज संध्याकाळी व सकाळी हवाई कसरत करतात. त्यांनी तयार केलेले विविध आकार निसर्गप्रेमींसह नागरिकांचे आकर्षण ठरत आहे.

इंग्रजीत रोझी पॅस्टर व रोझी स्टर्लिंग या नावाने हे पक्षी ओळखले जातात. युरोप खंडातील विविध राष्ट्रांमध्ये हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडते. त्या थंडीपासून बचावासाठी हे पक्षी भारतात विशेषकरून महाराष्ट्रात दरवर्षी येतात. राज्यातील ज्वारी पिकणाऱ्या प्रदेशात बहुसंख्येने हे पक्षी हिवाळ्यात दाखल होतात. हेच पक्षी सकाळी आणि सायंकाळच्या वेळी एकत्र येऊन विविध कसरती करताना दिसून येतात. भोरड्यांच्या या एकत्र येण्याच्या प्रकाराला इंग्रजित ‌‘मुर्मुरेशन‌’ म्हणतात. मुर्मुरेशन म्हणजे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शनच असते.

पळसदेव परिसरातील शिंदेवस्ती, काळेवाडी, डाळज नं. 1 आदी गावांच्या शिवारातील भूभागात शिरलेल्या उजनी धरणाच्या यशवंत जलाशयाच्या पाणलोट क्षेत्राच्या काठावरील झाडीझुडपात हे पक्षी मोठ्या संख्येने मुक्कामाला आहेत. हे पक्षी एकाच वेळी उभ्या पिकांवर डल्ला मारत असल्यामुळे ते शेतकऱ्यांसाठी उपद्रवी ठरतात.

पक्षांनी खाद्य सवय बदलली

पुणे जिल्ह्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपले शेतजमीन ओलिताखाली आणून ज्वारीपिकाकडे दुर्लक्ष करत वर्तमानात बागायती शेतीकडे वळले आहेत. अशा परिस्थितीमध्येही या पक्ष्यांनीही आपल्या खाद्य सवयीत बदल करत सध्या ते द्राक्ष, पपई, अंजीर, डाळिंब, बोर यांसारख्या फळपिकांवर उपजीविका चालवतात.

...असा आहे भोरड्यांचा दिनक्रम

स्थलांतर करून आल्यानंतर या पक्ष्यांच्या अनेक थवे मुक्कामासाठी एक मोठे झाड किंवा मोठ्या झुडपांचे ठिकाण निश्चित करतात. दिवसभर चरून ठरलेल्या ठिकाणी ते आसनस्थ होतात. विसावण्यापूर्वी सायंकाळी हे सर्व पक्षी ठरलेल्या वेळत एकत्र येऊन हवाई कसरती करतात. या वेगवान करसती करताना त्यांच्यात असाधारण मेळ पाहायला मिळतो. त्यातून कसरती अतिशय विलोभनीय ठरतात. सुमारे पंधरा मिनिटांच्या कसरतीनंतर हे पक्षी एकच कलकलाट करून आपल्या ठिकाणी विसावतात. त्यानंतर अंधार दाटला की एकदम चिडीचूप होतात. सूर्योदयाबरोबर हे पक्षी पुन्हा सुमारे दहा-बारा मिनिटे हवेत घोंगावत कसरत करतात. त्यानंतर सर्व दिशेने अन्नाच्या शोधात विखरून जातात.

भोरड्या पक्षी यावर्षीही उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात उदरनिर्वाहासाठी आले आहेत. दिवसभर चरून झाल्यानंतर या पाणथळीजवळच्या झाडाझुडपांत ते आश्रय घेतात. याच परिसरात भोरड्या सायंकाळी व सकाळी आकाशात कसरती करतात. या पक्षातील मुर्मुरेशन ही क्रिया ‌‘बायोअंशी‌’ या शास्त्रीय तत्त्वांवर अवलंबून असते.
डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT