

लोणी भापकर : बारामती तालुक्यातील लोणी भापकर (सिद्धपुरी) या ठिकाणी देशातील एकमेव दशभुजा दत्तमूर्ती आहे. येथे श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 4) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येथील सोहळ्यास पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात.
लोणी भापकर येथे 12व्या शतकातील मल्लिकार्जुन मंदिर, तसेच परमहंस श्री दत्तानंद सरस्वती महाराज यांची संजीवन समाधी आहे. याठिकाणी नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना स्वतः परमहंस श्री दत्तानंद सरस्वती महाराज यांनी केली आहे. याच ठिकाणी भव्य असे दत्त मंदिर, वराहमूर्ती व पुरातन पुष्करणी (बारव)देखील आहे.
येथे दत्त जयंतीनिमित्त सकाळी 7 वाजता महाअभिषेक व नित्यपूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3 ते 4 यादरम्यान लोणी भापकरचे बालकलाकार तबलावादक अभिमन्यू प्रकाश कराडे व हार्मोनियमवादक वीर प्रकाश कराडे या बंधूंचे गायन व वादन होणार आहे. दुपारी 4 ते 5 या काळात ज्येष्ठ नागरिक कलामंच स्वरमंदिर, धायरी, पुणे यांचे सुगम संगीत होईल. यासाठी तबलासाथ श्रीकांत एकबोटे व हार्मोनियमसाथ मुकुंद दिवाण यांची असणार आहे. सायंकाळी 5 ते 5.45 यादरम्यान श्री भैरवनाथ भक्त भजनी मंडळ लोणी भापकर यांचे भजन होणार आहेत. सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी (सूर्यस्तावेळी) श्री दत्तजन्म होणार आहे. यावेळी पुष्पवृष्टी करण्यात येते. त्यानंतर खिरापत, सुंठवडा वाटण्यात येईल. त्यानंतर आरतीचा कार्यक्रम होईल.
शुक्रवारी (दि. 5) सकाळी 9 वाजता रुद्राभिषेक व दुपारी एक वाजल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्रींची पालखीची दत्त मंदिरापासून गावात श्री भैरवनाथ मंदिरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि. 6) सुपे येथील क्षीरसागर बंधू यांच्या वतीने लघुरुद्र अभिषेक तसेच महाप्रसाद (भंडारा) घातला जातो. याबाबत दशभुजा दत्त संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गोलांडे, कार्याध्यक्ष बापूसाहेब गोलांडे, सचिव श्रीकांत भापकर यांनी माहिती दिली.