पुढारी विशेष, भरत मल्लाव (भिगवण) :
सततच्या वाढत्या प्रदूषणामुळे उजनी केंव्हाच काळवंडली, सांडपाण्याचे डबके झाली, तिचा श्वास कोंडला, तिने आक्रोश केला पण राज्यकर्त्यांना पाण्याखाली दबलेले कोट्यवधी रुपयांचे काळ्या सोन्याचे घबाड दिसतंय. त्यांना सर्वत्र पसरलेली प्रदूषणाची घाण आणि दुर्गंधी दिसत नाही. पण प्रदूषणामुळे आता खरच आपली जीवनदायी व पोषणकर्ती उजनीआई वृद्ध झाली आहे, आजारी पडली आहे. राजकीय अनास्था तिच्या जीवावर उठली आहे.
उजनी प्रदूषण रोखण्याचा विडा आता पुन्हा एकदा नव्याने जलतज्ज्ञांनी उचलला असून, याची सुरुवात भिगवण व राजेगावपासुन करण्यात आली आहे. भीमा काठाची व उजनीची लेकरांनी जर ही चळवळ हाती घेतली तर आणि तरच उजनी शुद्धीच्या आशेचा किरण दिसू शकतो, असा विश्वास या जलतज्ज्ञांना आहे. भीमा, मुळा-मुठा ते उजनीच्या प्रदूषणामुळे हडपसरपासुन ते पंढरपूर, सोलापूरपर्यंतचे किमान ४० लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा दावा जलतज्ज्ञ करीत आहेत. या सर्व नद्यातून दैनंदिन ७० कोटी लिटर प्रदूषित पाणी मिसळले जात आहे. मानवी आरोग्याबरोबरच शेती, दुग्ध व मत्स्यव्यवसाय अडचणीत आला आहे.
पिंपरी चिंचवड, कुरकुंभ सारख्या ठिकाणच्या मोठ्या औद्योगिक कंपन्या शुद्ध पाणी घेतात आणि अशुद्ध व रासायनिक पाणी थेट नदी नाल्यात सोडत आहेत. पुण्याचे मैलामिश्रित सांडपाणीही थेट सोडले जात आहे. खरे तर दुषित पाण्याचा उपाय हा पुणे व पिंपरी चिंचवड मध्येच लपला आहे. मात्र भांडवलदार कंपन्या व राजकीय नेते एकमेकांचे बटीक असल्याने प्रदूषणाचा आवाज दाबला जात आहे हे वास्तव आहे.
खरे तर भीमा, मुळा-मुठेचे पाणी शुद्ध आहे असे म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधी व कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी हे पाणी पिऊन तरी दाखवावे किंवा त्यात डुबकी तरी मारून दाखवण्याचे धाडस दाखवावे. लाखों नागरिकांना नैसर्गिकरित्या मिळणारे फुक्कटचे पाणी बंद होऊन विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाण्यामुळे आजार जडले गेल्याने त्याच्या खर्चाचा बोजा वाढला आहे. मुतखडा, कॅन्सर आदी रोगांचे केंद्र आता उजनी भोवती तयार झाले आहे.
गेल्या वीस वर्षात प्रदूषणाचा आक्रोश होत असताना राज्यकर्ते मात्र ही बाब दृष्टीआड करीत आहेत. विशेष म्हणजे उजनी जलाशयात किती कोटींची वाळू दडली आहे, मातीमिश्रित वाळु किती याचा हिशेब या राज्यकर्ते व अधिकाऱ्यांकडे आहे. परंतु उजनी प्रदूषणाचा अहवाल मात्र गुलदस्त्यातच आहे. दरम्यान जेष्ठ जलतज्ज्ञ विनोद बोधनकर व नरेंद्र नरेंद्र छुग आदीजण प्रदूषण रोखण्यासाठी लढा देण्यास सज्ज झाले आहेत. प्रसंगी हरित लवाद व उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच अकलूज येथे बैठक घेण्यात आली आहे. त्यांना लोकसहभागाची मोठी अपेक्षा आहे.
उजनीत येणाऱ्या पाण्यात रासायनिक घटक जेवढ्या प्रमाणात आढळतात, तेवढ्याच प्रमाणात विष्ठा व मालमूत्राचे घटक जलतज्ज्ञांना आढळून येत असल्याचा धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे लाखो नागरिक हे रोज मलमूत्र, विष्ठा, रासायनिक पाण्यात अंघोळ करतात व हेच पाणी पिण्यासाठी वापरतात.
मुळा-मुठा, भीमा व उजनीच्या प्रदूषणाची पातळी धोक्याच्या पलीकडे ओलांडली असल्याने नदी व उजनी स्वच्छता महत्वाचा विषय पुढे असताना आता सहा हजार कोटी रुपये सुशोभीकारणासाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे जखम पायाला अन मलम शेंडीला असा झाला आहे. ४० लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना स्वच्छतेला प्राधान्य देण्याऐवजी सुशोभीरणाचा घाट नक्की कोणाच्या भल्यासाठी आहे असा प्रश्न पडला आहे.
उजनीच्या सततच्या वाढत्या प्रदूषणामुळे शेती नापीक होताना दिसत आहे. पाळीव जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परीणाम झाला आहे, तर मत्स्यव्यवसाय पूर्णपणे धोक्यात आला आहे. एकंदरीत उपलब्ध रोजगार संकटात सापडले आहेत. राजेगाव, सोनवडी भागात तर मच्छिमारांच्या जाळ्यात माशांऐवजी प्लास्टिक कचराच जास्त सापडत आहे.