वॉशिंग्टन : ‘नाटो’-रशियात युद्ध झाल्यास तिसरे महायुद्ध | पुढारी

वॉशिंग्टन : ‘नाटो’-रशियात युद्ध झाल्यास तिसरे महायुद्ध

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
रशियाने युक्रेनविरोधातील युद्धात रासायनिक शस्त्रास्त्रांचा वापर केल्यास रशियाला मोठी किंमत मोजावी लागेल. तसेच रशिया आणि ‘नाटो’दरम्यान लढाई झाल्यास तिसरे महायुद्ध अटळ असेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. दरम्यान, अमेरिकेने रशियाविरोधातील निर्बंध आणखी कडक केले.

रशियाने युक्रेनविरोधात सुरू केलेल्या युद्धाला शनिवारी 17 दिवस झाले आहेत. यादरम्यान, अतोनात वित्तीय आणि मानवी हानी झाली आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह आणि आसपासच्या परिसरात जोरदार हल्ले सुरू केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाश्‍चात्त्य देशांनी रशियावर निर्बंधांचा फास आणखी आवळायला सुरुवात केली आहे. त्याला रशियाकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक उडवून देण्याची धमकी शनिवारी दिली आहे. दुसरीकडे, रासायनिक शस्त्रास्त्रांच्या वापराच्या शक्यतेने अमेरिकेने रशियाला थेट इशारा दिला असून, अशी आगळीक रशियाने केल्यास त्याला जबर किंमत मोजावी लागेल. अमेरिका आणि त्याचे सहयोगी देश या हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देतील, असा इशारा दिला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांना बायडेन यांनी युरोप दौर्‍यावर पाठवले आहे. युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून काही पावले तातडीने उचलण्यात यावीत, अशी यामागची अमेरिकेची भूमिका आहे.

 

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा इशारा
  • रशियावर पाश्‍चात्त्य देशांकडून कडक निर्बंध
  • आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक उडवून देऊ : पुतीन यांची धमकी

Back to top button