पुणे : निवृत्त आयपीएस अधिकार्‍याचा कोट्यवधींच्या बिटकॉईनवर डल्ला | पुढारी

पुणे : निवृत्त आयपीएस अधिकार्‍याचा कोट्यवधींच्या बिटकॉईनवर डल्ला

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : देशभरात गाजलेल्या बिटकॉईन या आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) फसवणूक प्रकरणात मदतीसाठी घेतलेल्या दोघा सायबर तज्ज्ञांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन कपंनी सुरू केलेल्या एका आयपीएस अधिकार्‍याचा समावेश आहे. दोघेही सायबर तज्ज्ञ म्हणून पोलिसांना बिटकॉईनच्या तपासात मदत करत होते.

मात्र, तपासात शासनाची फसवणूक करत संशयास्पद कृती केल्याचे चौकशीत आढळल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. संबंधित माजी आयपीएस अधिकारी सायबर तज्ज्ञाने स्वतःच्या नावावर 60 पेक्षा अधिक बिटकॉईन परस्पर लंपास केल्याचे समोर आले आहे. त्याचे सध्याचे बाजारमूल्य 20 कोटींपेक्षा अधिक असल्याचे समजते.

सायबर तज्ज्ञ पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड) आणि सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रवींद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पाटील हा 2004 च्या बॅचचा आयपीसएस अधिकारी आहे. मात्र, त्यानंतर त्याने नोकरीचा राजीमाना दिला होता. पंकज घोडे याच्या विविध कंपन्या असून, तो सायबर तज्ज्ञ म्हणून काम पाहतो.

Back to top button