पुणे

पुण्यात स्विमिंग टॅंक चालवणं परवडेना; अकरा वर्षांपासून दर वाढ होईना

अमृता चौगुले
नितीन पवार
पुणे: जलतरण तलाव चालवण्याचा व्यवसाय तसा हंगामी. उन्हाळ्यातील तीन-चार महिने वगळता वर्षभर इकडे कुणी फिरकतही नाही. अशा  परिस्थितीत  खर्च सुरू राहतात, उत्पन्न मात्र कमी झालेले असते. अशा तलावावरील प्रवेश शुल्क गेल्या अकरा वर्षांत तेवढेच असल्याने देखभाल खर्च, कर्मचार्‍यांचे पगार, तलावाचे भाडे कसे द्यायचे, असा प्रश्न जलतरण तलाव चालवणार्‍या व्यावसायिकांसमोर असून, तलाव चालवणे परवडनासे झाले आहेत.
कोणत्याही जलतरण तलावाचे मुख्य उत्पन्न हे तलावावर येणार्‍यांकडून मिळणारे प्रवेश शुल्क हेच असते. मात्र गेल्या अकरा वर्षांपासून प्रवेशशुल्क वाढ झालीच नाही. याउलट तलावाच्या भाड्यामध्ये तिपटीने वाढ झाली,  जीवरक्षकांचे पगार, लाईट बील, केमिकल खर्च, क्लोरिन सिलेंडर, देखभाल-दुरुस्ती खर्च, पाणी दर, वॉचमन, साफसफाई हे खर्च तिपटीने वाढले आहेत. काही वेळा तलावावर पाणी विकत आणावे लागते त्याचा खर्च आणखी वेगळा असतो.त्यामुळे जलतरण तलाव चालवताना उत्पन्न कमी खर्च अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली असून तलाव चालवणे अतिशय जिकरीचे होत चालले आहे.
परिणामी शहरातील छत्तीस तलांवांपैकी केवळ 15 ते 16 तलावच सुरू असून बाकीचे बंद पडले आहेत.गेल्या 11 वर्षांपूर्वी जलतरण तलावावर येणार्‍यांकडून प्रवेश शुल्कापोटी 20  रुपये तिकिट आकारले जात होते. तोच दर अद्याप सुरू आहे. याउलट जलतरण तलावाचा व्यवस्थापन खर्चात मोठी वाढ झाली आहे
तलावावर येणारी प्रत्येक बॅच ही 45 मिनिटांची असते. सकाळी 6 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत बॅचेस सुरू असतात. मध्ये काही बॅचेस महिलांसाठीही असतात. त्यासाठी पाणी  वारंवार बदलावे लागते. साहजिकच खर्च वाढत असल्याने जलतरण तलाव चालवायचे कसे असा सवाल तलाव चालक उपस्थित करत आहेत.
महापालिकेचे अकरा वर्षांपासूनचे सुरू असलेले दर
  •  1 तास तिकीट दर       : 20 रुपये
  • महिना पास                 :350 रुपये
  • वार्षिक पास                : 3200 रुपये
  • विद्यार्थी सवलत पास    : 250 रुपये
शाहू जलतरण तलाव
वर्ष           भाडे                तिकीट दर
2012      21333          20 रुपये
2017       57950          20 रुपये
2018       63000          20 रुपये
नवीन मूल्यांकनानुसार भाडे – 89,000
महापालिकेकडून दरवेळी सांगण्यात येते की, पाणी निळे ठेवा, प्रत्येक जीवांची काळजी घ्या, लाईफ गार्ड ठेवा, जास्त गर्दी सोडू नका. लिमिटेड लोक आत मध्ये सोडा. महापालिकेच्या तलावांची अवस्था बिकट झाली आहे. येथे शेड नाहीत. काही तलावांची आकार अडनीड आहेत. कोरोना काळात सर्वांत उशिरा सुरू झाले असतील तर जलतरण तलाव. त्यावेळीही आम्ही तलाव बंद ठेवून सर्व भाडे भरले. ठेकेदार यावेळी पैसे आणणार कुठून, आमचाही विचार करा. तिकीट दर वाढविण्याबाबत वारुळेसाहेब यांच्याबरोबर वारंवार पत्रव्यवहार केला आहे.
                                                                 – सुरेश भोकरे, अध्यक्ष, स्विमिंग पूल असोसिएशन, पुणे.
शहराच्या मध्यवर्ती भागात शाहू जलतरण तलाव असल्यामुळे आम्ही येथे पोहण्यास येतो. खासगी तलावावर पोहणे परवडत नाही. उन्हाळ्यात येथील बॅच लवकर फुल्ल होतात. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी आधीच यावे लागते.
                                                                                                      – शाळकरी मुले

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT