पुणे : पांडुरंग सांडभोर : पात्र ठेकेदारांना अपात्र करण्याचा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये चालणारा उद्योग आता थेट महापालिकेच्या टेंडर कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे, यासाठी उपायुक्तांनी पात्र ठरविलेल्या ठेकेदारांना टेंडर विभागातील कर्मचार्यांनी निविदांवर खाडाखोड करून अपात्र केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महापालिकेच्या घोले रोड उपायुक्त परिमंडळ क्र. 2 कार्यालयाने प्रभाग क्र. 10 (क) मधील ड्रेनेजलाइन, सांस्कृतिक हॉल यांसारख्या प्रत्येकी 10 लाख रुपये रकमेच्या विकासकामांच्या 9 निविदा काढल्या होत्या. या सर्व निविदांमध्ये सहभागी झालेल्या ठेकेदारांची 'ब' पाकिटे उघडल्यानंतर उपायुक्त नितीन उदास यांनी नमुनापत्रावर पात्र ठेकेदारांची प्रत्येक निविदानिहाय यादी टेंडर विभागाकडे ऑनलाइन नोंदणीसाठी पाठविली. मात्र, टेंडर विभागातील कर्मचार्यांनी ई-टेंडरवर ऑनलाइन नोंदणी करीत असताना 9 पैकी केवळ 5 टेंडर पात्र असल्याची नोंद केली. उर्वरित 4 टेंडरवर खाडाखोड करून 'पात्र'च्या ठिकाणी 'अपात्र' अशी नोंद केली.
बाबत जय श्री राम कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार सुनील चव्हाण यांनी संबंधित टेंडर कर्मचार्यांकडे विचारणा केली. त्यावर येथील कर्मचार्यांनी उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ठेकेदार चव्हाण यांनी ई-वेबसाइटवर जाऊन पाहणी केली असता 9 पैकी 5 निविदा पात्र आणि 4 निविदा अपात्र ठरविले. निविदेचे 'ब' पाकीट उघडल्यानंतर पात्र ठरले असताना ऑनलाइन नोंदणीत मात्र 4 निविदा अपात्र केल्याचे लक्षात आल्यावर ठेकेदार चव्हाण यांनी टेंडर विभागातील अधिकारी कर्मचार्यांपासून उपायुक्त कार्यालयापर्यंत चौकशी केली. मात्र, सर्वांकडूनच असमाधानकारक उत्तरे दिली.
उपायुक्त कार्यालयाकडून 9 निविदांमधील पात्र ठेकेदारांची जी फाईल टेंडर विभागाकडे पाठविली, तीत 'पात्र' शब्दाच्या पुढील आणि मागील बाजूने उभी रेषा मारून ठेवली होती. तसेच, संबंधित कर्मचार्याने त्याचे फोटोही स्वतःकडे काढून ठेवले होते. मात्र, ही फाईल टेंडर विभागात आल्यानंतर येथील कर्मचार्यांनी 'पात्र' शब्दाच्या पुढे मारण्यात आलेल्या रेषेच्या पुढील बाजूस 'अ' शब्द टाकला आणि काही ठेकेदारांना अपात्र केले. त्यासाठी बँक स्लोव्हसी दाखला नसल्याचे कारण जोडले आणि ती कागदपत्रे वेबसाइटवर टाकली. मात्र, उपायुक्त कार्यालयाने 'पात्र' शब्दापुढे मारलेली रेषा, त्यात झालेली खाडाखोड आणि कर्मचार्याने काढलेले फोटो, यामुळे हे अपात्रतेचे बिंग अखेर फुटले.
''महापालिकेच्या घोले रोड कार्यालयातील टेंडर सेल कर्मचार्यांनी निविदापत्रावर खाडाखोड करून आम्हाला अपात्र ठरविले आहे. संबंधित कर्मचार्यांची चौकशी करण्यात यावी; अन्यथा आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू.''
– सुनील चव्हाण, ठेकेदार