Swaysiddha Women Self Defense Scheme Pudhari
पुणे

Swaysiddha Women Self Defense Scheme: ‘स्वयंसिद्धा’ महिला स्वसंरक्षण योजना कायमची बंद; २००३ पासून सुरू असलेल्या उपक्रमाला शासनाचा ब्रेक!

मागील ४-५ वर्षांत निधी व अंमलबजावणी ठप्प; समान उपक्रम अन्य विभागांकडून सुरू असल्याने क्रीडा विभागाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत महिलांना सक्षम व स्वयंसिद्ध बनविण्याच्या उद्देशाने सन २००३ पासून राबविण्यात येणारा ‘स्वयंसिद्धा’ महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम हा उपक्रम राज्य शासनाकडून कायमस्वरूपी बंद केला आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जाहीर केला आहे.

नियोजन विभागामार्फत राज्यातील विविध योजनांचे पुनर्विलोकन केले. यामध्ये ज्या योजना कालबाह्य झाल्या आहेत किंवा ज्यांचे उद्देश समान असलेले उपक्रम इतर विभागांमार्फत सुरू आहेत, अशा योजनांचा आढावा घेतला.

‘स्वयंसिद्धा’ या योजनेचे उद्दिष्ट साध्य करणारे स्वसंरक्षणविषयक उपक्रम इतर शासकीय यंत्रणांद्वारे आधीच राबविले जात असल्याने या योजनेच्या माध्यमातून स्वतंत्रपणे उपक्रम राबविण्याची आवश्यकता उरली नव्हती. शिवाय, मागील ४ ते ५ वर्षांत या योजनेसाठी कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद केली नव्हती तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीही झालेली नव्हती.

याच सर्व बाबींचा विचार करून क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने हा उपक्रम बंद करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्यानुसार शासनाने २० जून २००३ रोजीचा मूळ शासन निर्णय रद्द करीत ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या योजनेच्या लेखाशीर्षांतर्गत यापुढे कोणतीही नवीन आर्थिक वा अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येऊ नये, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

२००३ पासून राबविण्यात येणारा ‘स्वयंसिद्धा’ महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण योजना बंद झालेली नाही तर ती महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केली आहे. या विभागाकडून पूर्वीपासून जिल्हा परिषद स्तरावरून ही योजना सुरू असल्याने क्रीडा विभागाकडील ही योजना बंद केली आहे.
संजय सबनीस, प्रभारी सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT