पुणे: स्वारगेट स्थानकातील अत्याचार खटल्याच्या सुनावणीस सुरुवात झाल्याने घटनेतील पीडिता दुपारी बाराच्या सुमारास न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर झाली. मात्र, न्यायालयात आपल्यासोबत घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगताना तिला अश्रू अनावर झाले. बोलता बोलता तिला रडू कोसळले आणि पुढे साक्ष देणे कठीण झाले.
त्यामुळे न्यायालयाने साक्ष नोंदविण्याचे कामकाज काही काळ थांबवून तिला पाणी पिण्यासाठी आणि स्वतःला सावरण्यासाठी विश्रांती दिली. काही वेळानंतरही पीडिता अस्वस्थ असल्याने तिची साक्ष पुढे सुरू ठेवणे शक्य झाले नाही. अखेर न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. त्यामुळे बहुचर्चित स्वारगेट स्थानकातील अत्याचाराच्या खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीच्या पहिल्याच दिवशी पीडितेची साक्ष अपूर्ण राहिली.
पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात या खटल्याच्या प्रत्यक्ष साक्षीपुराव्याला शनिवारपासून सुरुवात झाली. त्यानुसार पीडितेला साक्षीसाठी न्यायालयात हजर केले होते. घटनेबाबत माहिती देताना ती भावूक झाली. तिची अवस्था लक्षात घेऊन न्यायालयाने साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया थांबविली.
विश्रांतीनंतरही साक्ष पुढे सुरू ठेवता न आल्याने न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ५ डिसेंबर २०२६ ही तारीख निश्चित केली. दरम्यान, या खटल्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात सरकार पक्षातर्फे खटल्याचे कामकाज सुरू असून, त्यांना ॲड. प्रथमेश शिंगणे, ॲड. राकेश सोनार आणि ॲड. राधिका नावंदर-जोशी सहकार्य करत आहेत.
दिशाभूल करून तरुणीवर केला होता अत्याचार
स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. आरोपीने साताऱ्याची बस तिकडे लागते अशी दिशाभूल करून पीडितेला बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन बलात्कार केला होता. आरोपी दत्तात्रय गाडेला त्याच्या गावातून अटक केली होती. जून २०२६ मध्ये विशेष न्यायालयात त्याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते.