

पुणे: लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमणांवर महापालिकेने शुक्रवारी जोरदार कारवाई केल्याचा दावा केला असला, तरी दुसऱ्याच दिवशी या कारवाईचा फोलपणा उघड झाला. शुक्रवारी ४० ते ५० दुकानांचे दर्शनी भाग आणि नामफलक तोडण्यात महापालिकेच्या पथकाने धन्यता मानली. मात्र, रस्त्यावरील अतिक्रमणे आणि पथारी व्यावसायिकांचे बस्तान कायम राहिले. शनिवारी पुन्हा संपूर्ण लक्ष्मी रस्ता पथारी व्यावसायिकांनी गजबजलेला दिसला. पदपथांवरही व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम केवळ नामफलकांपुरतीच मर्यादित राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवरून सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरात पुढील दोन महिने रोज अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून शहरात कारवाई सुरू आहे. शुक्रवारी शिवाजी रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावर विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय व आकाशचिन्ह विभागाने संयुक्त कारवाई केली. मात्र, प्रत्यक्ष अतिक्रमणे हटवण्याऐवजी लक्ष्मी रस्त्यावरील ४० ते ५० दुकानांचे दर्शनी भाग आणि नामफलक तोडण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यानंतर दुकानदारांनी नामफलक स्वतःहून काढण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितल्याने त्यांना मुदत देण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त राजेश शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मी रस्त्याची पाहणी केली असता रस्त्यावर पुन्हा नागरिकांची मोठी वर्दळ दिसली. पथारी व्यावसायिक रस्त्याच्या कडेला उभे होते, तर पदपथांवरही अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे वाहतुकीस आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास कायम असल्याचे दिसून आले.
अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेनंतरही परिस्थिती पूर्ववत झाल्याने महापालिकेच्या कारवाईच्या नियोजनावर टीका होत आहे. दुकानदारांच्या पाट्या हटवण्याबरोबरच रस्ते, पदपथ आणि वाहनतळांच्या जागांवरील अतिक्रमणे सातत्याने हटवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. एका दिवसाच्या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी अतिक्रमणे 'जैसे थे' असल्याने ही मोहीम केवळ दिखाऊ ठरली का? असा सवाल उपस्थित होत आहे.
कारवाईचा गाजावाजा, अतिक्रमणे मात्र कायम!
आयुक्तांच्या आदेशानंतर शहरात रोज अतिक्रमणविरोधी कारवाईचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. मात्र, लक्ष्मी रस्त्यावर शुक्रवारी कारवाई करूनही शनिवारी पथारी व्यावसायिक आणि पदपथांवरील दुकाने 'जैसे थे' दिसली. त्यामुळे कारवाई केवळ एक दिवसापुरतीच होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अतिक्रमणे हटवून रस्ते आणि पदपथ नागरिकांसाठी मोकळे करण्याचे आव्हान महापालिकेसमोर कायम आहे.
अतिक्रमण, बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना आता सुटी नाही!
शहरातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिका प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. नगरसेवकांनी सभागृहात प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम अधिक तीव्र केली आहे. सलग चौथ्या दिवशी, शनिवारी (दि. २१) शहराच्या विविध भागांत बुलडोझर फिरवून अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत तब्बल ९९ हजार ८७ चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला शहरात नियमित आणि व्यापक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपआयुक्त सोमनाथ बनकर, उपआयुक्त अविनाश सपकाळ आणि परिमंडळ क्रमांक दोन यांच्या नियंत्रणाखाली शनिवारी ही मोहीम राबवली. नगर रस्ता-वाघोली, शिवाजीनगर-घोले रस्ता, सिंहगड रस्ता, हडपसर-मुंढवा आणि बिबवेवाडी या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत महापालिकेच्या पथकांनी एकाच वेळी कारवाई केली. वाघोली-बाकोरी रस्ता, आय. व्ही. इस्टेट रस्ता, आपले घर, कल्याणीनगर, कोथरूडमधील रामबाग कॉलनी, सुतारदरा, सुस खिंड परिसर, नागरस रस्ता, आर्यभूषण लेन, यशोदीप हॉटेल, जनसेश्वर पादुका चौक, सिंहगड रस्त्यावरील गोयल गंगा चौपाटी, वडगाव पूल ते धायरी फाटा, नांदेडमधील लक्ष्मी दुकान लेन ते मानाजीनगर रस्ता, हडपसरमधील साधना शाळा-माळवाडी रस्ता, साळुंखे विहार आणि बिबवेवाडीतील लेक टाऊन ते डॉल्फिन चौक या परिसरात कारवाई केली. विशेष म्हणजे, केवळ हातगाड्या, पथाऱ्या आणि स्टॉल हटवण्यापुरती ही मोहीम मर्यादित नव्हती. अनधिकृत बांधकामांवरही थेट बुलडोझर चालवण्यात आला. पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मिळून २७ स्टॉल जमीनदोस्त केले. चार हातगाड्या, २९ पथाऱ्या आणि २६ काऊंटर हटवले. याशिवाय ११ सिलिंडर आणि १२८ इतर शेड निष्कासित करण्यात आले. एका व्यावसायिक वाहनावरही कारवाई केली.
कारवाई केलेल्या ठिकाणांचा सविस्तर तपशील
नगर रस्ता-वाघोली क्षेत्रीय कार्यालय
वाघोली-बाकोरी रस्ता
आय. व्ही. इस्टेट रस्ता
आपले घर, कल्याणीनगर
शिवाजीनगर-घोले रस्ता, औंध-बाणेर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय
शिल्पा हाऊसिंग सोसायटी
रामबाग कॉलनी, कोथरूड
सुतारदरा, पाषाण
सूस खिंड, मुरकुटे गार्डन
यशोदा चौक
नागरस रस्ता
आर्यभूषण लेन
यशोदीप हॉटेल
फडतरे हॉटेल
ज्ञानेश्वर पादुका चौक
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय
गोयल गंगा चौपाटी
वडगाव पूल ते धायरी फाटा
लक्ष्मी दुकान लेन ते
मानाजीनगर रस्ता, नांदेड
हडपसर-मुंढवा, वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय
साधना शाळा,
माळवाडी रस्ता, हडपसर
साळुंखे विहार, वानवडी
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय
लेक टाऊन ते डॉल्फिन चौक
डॉल्फिन चौक ते महेश सोसायटी, बिबवेवाडी