

पुणे: शहरात पावसाळ्यात वारंवार निर्माण होणारी पूरस्थिती, तुंबणारे पावसाचे पाणी आणि वाढता बांधकामांचा पसारा यांचा संबंध आता महापालिकेच्या सभागृहातील चर्चेतून समोर आला आहे. पुणे शहरातील तब्बल ४७ नाले वळविण्यात आल्याची माहिती शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
विशेष म्हणजे, हे नाले विकसकांच्या अर्जांवरून वळवण्यात आल्याचा मुद्दा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला. त्यामुळे शहरातील नैसर्गिक जलप्रवाहांशी विकासकांच्या सोयीसाठी केलेली छेडछाड आणि त्याचा भविष्यातील पूरस्थितीवर होणारा परिणाम याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यूडीसीपीआरमधील तरतुदी आणि त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या बदलांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी शिंदे यांनी २०२२ ते २०२६ या कालावधीत यूडीसीपीआरमध्ये किती बदल झाले, याची माहिती मागितली. त्यानंतर शहरात गेल्या चार-पाच वर्षांत किती नाले वळविण्यात आले आणि त्याला कोणाची मान्यता होती, असा थेट सवाल केला. मात्र, प्रशासनाकडे त्याची एकत्रित आकडेवारी उपलब्ध नसल्याचे पावसकर यांनी सांगितले.
यावर नगरसेवक शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत किती नाले वळवले असा प्रश्न केला. यावर पावसकर यांनी ४७ नाले आवळ्याचे सांगितले. हे डायव्हर्जन नागरिकांच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नव्हे, तर विकासकांच्या अर्जांवरून करण्यात आल्याचे शिंदे यांनी निदर्शनास आणले. यावर पावसकर यांनी नाले नियमानुसार वळविण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र, किती नाले कोणत्या कारणासाठी वळविले, याची सविस्तर माहिती सभागृहाला त्यांना देता आली नाही.
एफएसआय-टीडीआरच्या सवलतींचा गैरवापर?
सहा मीटर रुंदीच्या रस्त्याला जवळच्या नऊ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या आधारे एफएसआय आणि टीडीआर देण्याच्या तरतुदीचा गैरवापर झाला आहे का? याबाबतही शिंदे यांनी प्रशासनाला जाब विचारला. अशा प्रकारची सुमारे शंभर प्रकरणे असावीत, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र, त्याची अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही, अशी माहिती शहर अभियंता पावसकर यांनी दिली.