Nira Basin Dam Pudhari
पुणे

Someshwarnagar Nira Dam Water Leakage: सोमेश्वरनगरमध्ये बंधाऱ्यांतून पाणीगळती; शेतकऱ्यांचे संकट वाढले

निरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांतील दरप्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून शेतीसाठी पाणीटंचाईचा गंभीर धोका निर्माण झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यात पाऊस न झाल्याने शेतकरी आधीच संकटात सापडले आहेत. त्यातच निरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. अशा परिस्थितीत निरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांतून होत असलेल्या पाणीगळतीमुळे सोमेश्वर परिसरातील शेतीसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्यावर परिसरातील शेती अवलंबून आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तीर्ण ऊस क्षेत्रासह भाजीपाला, फळबागा आणि खरीप पिकांसाठी हे पाणी जीवनवाहिनी मानले जाते.

मात्र, बंधाऱ्यांच्या दरप्यांमधून सुरू असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून, भविष्यात पाणीटंचाईचे संकट तीव्र होणार आहे. बंधाऱ्यांवरील दरपे (दरवाजे) व्यवस्थित बसविण्यात आलेले नाहीत. अनेक ठिकाणी झिजलेल्या व तुटलेल्या दरप्यांचा वापर करण्यात आल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. नवीन दरपे बसविण्याची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात बंधाऱ्यांवर दरपे बसवून पाणीसाठा सुरक्षित ठेवणे अपेक्षित असते. मात्र, यंदा जलसंपदा विभागाकडून योग्य वेळी नियोजन व देखभाल न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास बंधारे कोरडे पडण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होणार आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाकडे बंधाऱ्यांची तांत्रिक तपासणी करून नवीन दरपे बसविणे, आवश्यक दुरुस्ती करणे आणि पाणीसाठा सुरक्षित राखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT