Arrest Pudhari
पुणे

Pune Deer Poaching: सिंहगड पायथ्याशी दुर्मीळ हरणाची शिकार; तिघे शिकारी वन विभागाच्या जाळ्यात

रांजणे जंगलात कारवाई; हरणाचे मांस व दोन बंदुका जप्त, वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: सिंहगड किल्ला पायथ्याच्या रांजणे (ता. राजगड) जंगलात दुर्मीळ पिसोरी प्रजातीच्या हरणाची शिकार करून त्याच्या मांसाची वाटणी करीत असताना राजगड वन विभागाने छापा टाकत तिघा शिकाऱ्यांना मुद्देमालासह पकडले. या कारवाईत हरणाचे मांस व दोन बंदुका जप्त करण्यात आल्या.

मारुती बबन दारवटकर (वय 36, रा. कोंडगाव, ता. राजगड), दत्तात्रय लक्ष्मण नलावडे (वय 37) व गोरख हनुमंत नलावडे (वय 43, दोघे रा. निगडे मोसे, ता. राजगड) अशी पकडलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत. तिघांनाही सोमवारी (दि. 30) न्यायालयात हजर केले असता 2 एप्रिलपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. सिंहगडाच्या पश्चिमेकडील रांजणे हद्दीत रविवारी (दि. 29) वन्यप्राण्याची शिकार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला.

रांजणे फाट्यावर हरणाच्या मांसाची वाटणी करीत असताना मारुती दारवटकर, दत्तात्रय नलावडे व गोरख नलावडे या तिघांना पकडले. ते रिक्षामधून शिकारीसाठी आले होते. प्राथमिक तपासात ही शिकार दुर्मीळ पिसोरी प्रजातीच्या हरणाची असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मारुती व दत्तात्रय या दोघांकडून दोन बंदुका जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 आणि भारतीय शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, 3 महिन्यांपूर्वी ओसाडे येथेही हरणाची शिकार उघडकीस आली आहे.

पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व भोरच्या सहाय्यक वनसंरक्षक शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी लांडगे, वन परिमंडळ अधिकारी स्मिता अर्जुन, दया डोमे, वैशाली हाडवळे, मंजूषा घुगे, बी. एल. जगताप, राजेंद्र निंभोरे, ए. आर. सोनकांबळे, एस. एन. कांबळे, वाय. बी. टिकोळे, सुनील होलगिर, निखिल रासकर, एस. के. भैलुमे, स्वप्निल उंबरकार, अर्चना कोरके, अमोल गायकवाड, संतोष रणसिंग, विकास निकम आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT