प्रभाग क्रमांक : 12 छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी
शंकर कवडे
शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी या प्रभागामध्ये पहिली एव्हिएशन गॅलरी, अद्ययावत सिटी लायबरी, बहुमजली मेट्रो स्टेशन, दुहेरी उड्डाणपूल यापैकी काही विकासकामे झाली आहेत, तर काहींचे काम सुरू आहे. मात्र प्रमुख रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, ड्रेनेज व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष, अपुरा पाणीपुरवठा, पूरपरिस्थिती आणि झोपडपट्ट्यांमधील असुविधा आदी समस्या कायम आहेत. स्मार्ट असलेल्या या प्रभागात मूलभूत सुविधांची आजही वानवा असल्याचे चित्र दिसून येत आहे.
माजी नगरसेवकांच्या कार्यकाळासह प्रशासक राजच्या चार वर्षांतही प्रभागातील विविध समस्यांवर ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सेनापती बापट रस्ता आणि प्रभात रस्त्यावर पार्किंगबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने कायमच वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या गर्दीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड होत आहे. प्रभागातील मोठी झोपडपट्टी असलेल्या वडारवाडीतील नागरिक पाणी, अस्वच्छता, अपुरी स्वच्छतागृहे आणि कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत, याकडे माजी नगरसेवक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
प्रभागात उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय नागरिकांची संख्या अधिक आहे. शहराचा मध्यवर्ती भाग, तसेच महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था असल्याने परिसरात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे. प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन पुलाचीवाडी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरत आहे. दरवर्षी उद्भवणारी ही समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत. उच्चभ्रू परिसरातील रस्त्यांसह महत्त्वाच्या चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले होते. त्याची निगा राखण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाजीनगर मुख्यालयानजीकच्या पदपथावर लाखो रुपये खर्चून मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली आहे. त्याठिकाणी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच जेथे कोणी जात नाही अशा ठिकाणी खेळणी बसवून लाखो रुपयांच्या निधाचा अपव्यय करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शिवाजीनगर गावठाण, जुना तोफखाना, मॉडेल कॉलनी, डेक्कन जिमखाना, प्रभात रस्ता, वडारवाडी, घोले रस्ता, पोलिस वसाहत, हनुमाननगर, भांडारकर रस्ता, 1202 दत्त वसाहत, शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसर.
झोपडपट्ट्यांमध्ये अद्यापही मूलभूत सुविधांची कमतरता
जंगली महाराज रस्त्यावरील भुयारी मार्गात सुरक्षा यंत्रणेचा अभाव
वाहनांच्या गर्दीतून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड
रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा
प्रकल्पांच्या देखभाल, दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
शिवाजीनगर गावठाणात राज्यातील पहिली एव्हिएशन गॅलरी
कलेला वाव मिळण्यासाठी गोखले चौकात कलाकार कट्टा
जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावर प्रशस्त पदपथ
रोकडोबा मंदिर परिसरातील आरोग्य कोठीनजीक ओपन जीम
वडारवाडी भागातील डॉ. होमी भाभा रुग्णालयाचे नूतनीकरण
ड्रेनेज लाइन टाकण्यासह रस्त्यांचे काँक्रिटीकरण
पीएमपीत संचालकपदावर नेमणूक झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासाठी एक हजार पर्यावरणपूरक ई-बस घेण्यात आल्या. प्रभागात स्मार्ट पदपथ तयार करण्याला प्राधान्य दिले. कलाकार कट्टा, एव्हिएशन गॅलरी आदी प्रकल्प राबविले. सध्या सिटी लायबरीवर काम सुरू आहे. उच्चभ्रू आणि वस्तीपातळीवरील समस्या सोडविण्यास कायम पुढाकार घेतला.सिध्दार्थ शिरोळे, माजी नगरसेवक तथा आमदार
डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकात शिवशिल्प साकारण्यात आले. महापालिकेच्या शाळा आणि बसथांबे स्मार्ट करण्यास प्राधान्य दिले. उद्यानांत ज्येष्ठांसाठी आरामदायी सोयी उपलब्ध करून दिल्या. पाण्याचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. वडारवाडी भागातील डॉ. होमी भाभा रुग्णालयाचे नूतनीकरण केले.नीलिमा खाडे, माजी नगरसेविका
महापालिकेकडून मिळालेल्या निधीतून विविध जनहिताचे प्रकल्प राबविण्यात आले आहेत. कलाकार कट्टा, एव्हिएशन गॅलरी आदींसाठी पुढाकार घेतला. सध्या सिटी लायबरीवर काम सुरू आहे. मात्र, कार्यकाळ संपल्याने ते थांबले आहे. प्रभागात रस्ते, ड्रेनेज, स्वच्छतेसंबंधीत कामेही करण्यात आली.जोत्स्ना एकबोटे, माजी नगरसेविका
महापालिकेच्या शाळांमध्ये अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रभागात स्मार्ट बसस्टॉप उभारले असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली. रस्त्यांचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, वडारवाडीत ड्रेनेज लाइन आदी विकासकामे केली असून, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीमसह विविध उपक्रम राबविण्यात आले.स्वाती लोखंडे, माजी नगरसेविका
प्रभागातील उच्चभ्रू व मध्यमवर्गीयांसह झोपडपट्ट्यांमधील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच प्राचीन देवस्थानांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.हनुमंत बहिरट, रहिवासी
प्रभागातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास राज्यकर्ते आणि प्रशासनाने प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. मागील कित्येक वर्षांपासून काही समस्या अद्यापही कायम आहेत.ॲड. आकाश कामठे, रहिवासी