

पुणे: मदतीच्या बहाण्याने जवळीक साधून थंडपेयात गुंगीचे औषध पाजून महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर महिलेचे काढलेले विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तीन लाखांच्या खंडणीची मागणी करून 32 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका कथित पत्रकारावर गुन्हा दाखल केला आहे. हनुमंत राजकुमार सुरवसे (वय 29, रा. माळीमळा, लोणी काळभोर) असे त्याचे नाव आहे. याबाबत 41 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 3 ते 4 मे दरम्यान घडला आहे.
हनुमंत सुरवसे हा स्थानिक परिसरात पत्रकार म्हणून मिरवतो. एका कार्यक्रमात त्याची पीडित महिलेशी ओळख झाली होती. पीडित महिला वैद्यकीय क्षेत्रात काम करते. पीडित महिलेचे एका व्यक्तीकडे उसने दिलेले पैसे होते. ते पैसे काढून देण्याचा बहाणा करून सुरवसे हा पीडितेला आपल्या मोटारीतून घेऊन गेला. यानंतर थंडपेय पिण्यास देण्याचा बहाणा करून त्यातून गुंगीचे औषध पीडितेला पाजले. त्याने जबरदस्तीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. तिचे विवस्त्र फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले. यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेकडे तीन लाखांच्या खंडणीची मागणी सुरवसे याने केली.
महिलेने घाबरून त्याला 32 हजार रुपये दिले. सुरवसे याने पीडितेला राहिलेले पैसे न दिल्यास फोटो आणि रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर तू याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आमच्या बायका आणून मारत पोलिस ठाण्यात घेऊन जाईल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत.
आरोपी सुरवसे हा पत्रकार म्हणून परिसरात फिरतो. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर