

मुंढवा: मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालयामधील मुख्य रस्त्याच्या बाजूला दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग होत असल्याने येथे दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. येथील पदपथावरही दुचाकी वाहने लावली जात असल्याने मुंढवा वाहतूक पोलिसांनी पदपथाच्या बाजूला असलेल्या झाडांना प्लास्टिक पट्ट्या बांधल्या आहेत. येथे वाहनांच्या पार्किंगसाठी वाहनतळ उभारावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
येथील पिंगळे वस्ती रेल्वे उड्डाणपुलापासून ताडीगुत्ता चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दररोज दुचाकी व चारचाकी वाहने उभी केलेली असतात. येथील पदपथावरही दुचाकी वाहने उभी असतात. या वाहनांवर वाहतूक पोलिसांची वारंवार कारवाई होत असते.
मात्र, तरीही येथील पदपथावर वाहने लावली जात असल्याने वाहतूक पोलिसांनी या पदपथाच्या बाजुला असलेल्या झाडांना प्लास्टिक पट्ट्या बांधल्या आहेत. त्यामुळे येथील पदपथावर दुचाकी वाहनांचे पार्किंग नियंत्रणात आले आहे.
मुंढव्यातील पदपथांची दुरवस्था
पिंगळे वस्ती ते मुंढवा येथील महात्मा फुले चौकापर्यंत पदपथांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. नादुरुस्त पदपथांमुळे नागरिकांना येथून चालताना अडचणी येतात. त्यातच येथील पदपथावर दुचाकी वाहने लावली जात असल्याने नागरिकांनी चालायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पदपथांची दुरुस्ती करण्याविषयी मुंढवा वाहतूक पोलिसांनीही पालिकेला पत्र दिले आहे. मात्र, यावर अद्याप पालिकेकडून कार्यवाही झालेली नाही.
येथील पासपोर्ट कार्यालय ते ताडीगुत्ता चौक दरम्यान पदपथांवर उभ्या असलेल्या वाहनांवर आम्ही दररोज कारवाई करतो. पदपथावर दुचाकी वाहने उभी केली जाऊ नयेत, यासाठी आम्ही पदपथाच्या बाजूला असलेल्या झाडांना प्लास्टिक पट्ट्या बांधल्या आहेत. पदपथाच्या दुरुस्ती विषयी आम्ही पालिकेशीही पत्रव्यवहार केला आहे.
संदिप जोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मुंढवा वाहतूक विभाग