

पुणे: शहरातील टिळक चौक, कात्रज, धायरी आणि फुरसुंगी परिसरातील दुकाने आणि सदनिका फोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचे गुन्हे दाखल केले आहेत. सदाशिव पेठेतील हत्तीगणपती चौकातील एका झेरॉक्सच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील 45 हजार 800 रुपयांची रोकड चोरी केली.
याप्रकणी 25 वर्षीय व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी फिर्यादींचे दुकान बंद असताना चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील रोकड चोरी करून पळ काढला. दरम्यान, घरफोडीचा प्रकार फिर्यादींच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.
सच्चाईमाता कात्रज येथील साई निवास या सदनिकेतून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा 99 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार आंबेगाव पोलिसांनी चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांच्या परिवारासह साडूच्या भावाच्या अंत्यविधीला निलंगा लातूर येथे गेले होते. त्यामुळे त्यांची सदनिका बंद होती. त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सदनिकेत प्रवेश केला. त्यानंतर वॉशिंग मशीनध्ये ठेवलेला सोन्याचा डब्बा चोरी करून पोबारा केला.
धायरी येथील पोकळे दूध डेअरीचे शटर उचकटून चोरट्यांनी 92 हजार रुपयांची रोकड चोरी केली. याप्रकरणी 28 वर्षीय व्यावसायिकाने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
26 ते 27 नोव्हेंबरच्या कालावधीत फिर्यादीची डेअरी बंद होती. त्यावेळी चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दोन गल्ल्यातील 92 हजार रुपयांची रोकड चोरी केली. तसेच फुरसुंगी येथील एका मोबाईल शॉपीचा पत्रा उचकटून तीन हजार रुपयांची रोकड चोरी केल्याची घटना भेकराईनगर चौक फुरसुंगी परिसरात घडली. याप्रकरणी 33 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.