रावणगाव : ग्रामीण भागांमध्ये पारंपरिक शिपी आमटीची मागणी अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मूळतः अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत, राशीन परिसरातील हा खास पदार्थ आता दौंडसह विविध तालुक्यांत लोकप्रिय मेजवानी ठरत आहे. चवीला झणझणीत, मसालेदार आणि रुचकर असल्याने या आमटीने खवय्यांचे लक्ष वेधले आहे.
मार्गशीर्ष महिन्यात महिलांच्या गुरुवारच्या उपवासामुळेही या आमटीची मागणी अधिक वाढताना दिसते. सण, उत्सव, वाढदिवस, समारंभ यांमध्ये शिपी आमटीला खास पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे ही आमटी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही वर्गाला आवडणारा पदार्थ बनला असून, किंमतीनेही अंडी, मटण, चिकन, मासळीपेक्षा स्वस्त पडत आहे.
वाढत्या मागणीमुळे दौंड तालुका आणि आसपासच्या परिसरात मस्पेशल शिपी आमटीफचे बोर्ड हॉटेलांच्या बाहेर लावले जात असल्याचे दिसते. काही ठिकाणी किराणा दुकानांमध्ये आणि मॉलमध्येही रेडी-टू-कुक शिपी आमटीचे पॅक उपलब्ध होत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची संख्या वाढत असून, ग्रामीण भागात छोट्या फूड कॉर्नरना विशेष प्रतिसाद मिळतो आहे.
तूर, मूग, मसूर अशा तीन-चार डाळींचे मिश्रण, त्यात कांदा, लसूण, खोबरे, आले, धने पावडर, गरम मसाला वापरून अगदी घरगुती पद्धतीने तयार होणारी ही आमटी चवीला जितकी उत्तम तितकी पौष्टिकही आहे. सहज उपलब्ध साहित्य, सोपी रेसिपी आणि चवीष्ट परिणाम यामुळे अल्पावधीतच ती सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. रावणगाव, खडकी, मळद, भिगवण, उंडवडी, पाटस या परिसरात 80 ते 100 रुपये प्रतिलिटर या माफक दरात शिपी आमटी मिळत असून, पार्सलचीही सुविधा दिली जात आहे.
सुरुवातीला ट्रायल बेसवर दिवसाला 4 ते 5 लिटर विक्री होत होती. पण मागणी वाढत जाऊन आता ती 20 लिटरपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे ही आमटी पचायला हलकी असून, कोणताही त्रास होत नसल्याने लोकांचा विश्वास वाढत आहे.वैभव आटोळे,राधे फूड कॉर्नर, रावणगाव