Shetphalgarhe Health Centre Medicine Theft Pudhari
पुणे

Shetphalgarhe Health Centre Medicine Theft: गरिबांच्या उपचारांसाठीची औषधे रातोरात गायब; शेटफळगढे आरोग्य केंद्रातील प्रकाराने खळबळ

सेवेतून मुक्त केलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याने औषधे नेल्याचा आरोप; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी समितीची तपासणी, अद्याप गुन्हा दाखल नाही

पुढारी वृत्तसेवा

पुणे/भिगवण: जिल्हा प्रशासनाच्या खर्चातून गोरगरिबांसाठी खरेदी केलेल्या औषधांवर डॉ. स्नेहल कारंडे या कंत्राटी वैद्यकीय महिला अधिकाऱ्यानेच रातोरात डल्ला मारल्याची संतापजनक घटना इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. विशेष म्हणजे, कारंडे यांना दीड महिन्यापूर्वीच सेवेतून काढून टाकलेले होते, तरीही त्यांनी हे कृत्य केले असून, याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडे पडले.

जिल्हा आरोग्य विभागाने अखेर नागरिकांच्या दबावापुढे झुकत या प्रकरणात लक्ष घालून चौकशी समिती स्थापन करून कार्यवाही करण्याचे सोपस्कार सुरू केले आहे. मात्र, अद्यापही संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, हे बिंग फुटल्याने दबावतंत्र वापरणारे काही स्थानिक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगून उपचारार्थ आलेल्या रुग्णांना माघारी पाठविण्यात आले. मात्र, दोन दिवसांपूर्वी औषधे असताना अचानक औषधे संपल्याचे कारण समोर आल्याने नागरिकांना संशय आला. त्यामुळे काही नागरिकांनी अतितातडीची सबब सांगून येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित कंत्राटी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कारंडे ह्या दोन नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास केंद्रातील औषधे पोत्यात भरून दुचाकी आणि चारचाकीत घेऊन जाताना आढळून आल्याने या प्रकरणाला वाचा फुटली.

प्रशासन अनभिज्ञ की सोंग...

संबंधित घटना १ नोव्हेंबर रोजी घडली असल्याने आरोग्य केंद्रात जाणाऱ्या रुग्णांना औषधांअभावी माघारी पाठवले जात होते. अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्यानंतरही जिल्हा आरोग्य विभागाकडून कुठलीच कार्य़वाही झाली नाही. अखेर नागरिकांनी सतर्कतेने प्रकरण उघडकीस आणल्यानंतर प्रशासकीय पातळीवर पळापळ सुरू झाली. दुसरीकडे ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक स्थानिक राजकारण्यांनी या प्रकरणात अप्रत्यक्षपणे उडी घेत प्रकरण दाबण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे काही स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.

महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कारंडे यांना सेवेतून काढून टाकण्यात आले होते. मात्र, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आणि त्यातच मनुष्यबळाची कमतरता असल्याने डॉ. कारंडे यांची सेवा कायम ठेवली होती. १ नोव्हेंबर रोजी त्यांच्या जागी नवीन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करून त्यांना सेवामुक्त करण्यात आले होते. संबंधित घटना घडल्यानंतर समिती स्थापन करून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोषारोप निश्चित झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल.
डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी
स्थापन केलेल्या समितीनुसार, या प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवठा करण्यात आलेल्या औषधांचा पुरवठा आणि सध्याचा औषधांचा साठा, याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच, सीसीटीव्हीचे चित्रीकरणही तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार किती रुपयांच्या मालाची चोरी झाली, हे निश्चित करून गुन्हा दाखल करण्याची कार्य़वाही करण्यात येईल.
डॉ. ओमकार हेंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी तथा समितीप्रमुख, पंचायत समिती
आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात त्यांनी चौकशी समिती स्थापन केली असून, त्यांचा निष्कर्ष आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
सोमनाथ शेंडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, भिगवण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT