गणेश मंडळाचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक, अभिनव कल्पना राबविणारे माजी महापौर, आनंद ऋषीजी ब्लड बँकेचे संस्थापक, शरद पवार व सुरेश कलमाडींचे निकटवर्तीय काँग््रेास नेते, अशी शांतीलाल सुरतवाला यांची ओळख. 1979 ते 2007 या आपल्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक निवडणुका लढल्या. पण त्यांच्या आठवणीत राहिली ती त्यांनी 1979 मध्ये सिटी पोस्ट वॉर्डातून लढविलेली महापालिकेची पहिली निवडणूक. त्या निवडणुकीविषयी त्यांच्याच शब्दांत...
महापालिकेच्या 1974च्या निवडणुकीत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे डी. के. रासने उभे होते. त्यावेळी बाबू गेनू तरुण मंडळाने शिवसेनेच्या उल्हास काळोखे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काळोखे विजयी झाले. बाबू गेनू तरुण मंडळ त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. 1979 च्या निवडणुकीच्या वेळी मंडळाच्या बैठकीत मला उभे करण्याचा निर्णय झाला. उल्हास काळोखे तांबडी जोगेश्वरी वॉर्डातून उभे राहणार होते. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहणी करून माझ्यासाठी सिटी पोस्ट वॉर्डाची निवड केली. खरं तरं माझे घर तांबडी जोगेश्वरी या वॉर्डमध्येच होते. सिटी पोस्ट वॉर्डाशी अर्थाअर्थी माझा संबंध नव्हता. त्यावेळी प्रचारासाठी भिंती रंगवायची पद्धत होती. त्यामुळे सर्वप्रथम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सिटी पोस्ट वॉर्डातील सगळ्या मुतारींच्या भिंती रंगवून टाकल्या. सत्ताधारी पक्षाकडे म्हणजे काँग््रेासकडे तिकीट मागयचेच नाही, असे ठरले. म्हणून हुतात्मा बाबू गेनू तरुण मंडळाचे तरुण तडफदार अध्यक्ष शांतीलाल सुरतवाला यांना विजयी करा, असेच आम्ही भिंतीवर लिहिले होते.
एकीकडे अपक्ष म्हणून लढण्यासाठी जोरदार तयारी सुरू असतानाच नागरी संघटना उमेदवाराच्या शोधात असल्याची बातमी वाचणात आली. त्यावर मंडळाची पुन्हा एकदा मीटिंग झाली व नागरी संघटनेकडे तिकीट मागावे, असे ठरले. निळूभाऊ लिमये, बी. डी. किल्लेदार, बाबा आढाव, वसंत थोरात आदी दिग्गज नेते त्यावेळी नागरी संघटनेत होते. त्यांच्याकडे तिकीट मागितले आणि त्यांनी ते दिले. जनता पक्षाचे म. वि. अकोलकर या अनुभवी व अभ्यासू उमेदवारासह 14 जण रिंगणात होते. परंतु, मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या कामाच्या जोरावर 500 मतांनी मी विजयी झालो.
सिटी पोस्टच्या वॉर्डात 2700 देवदासी मतदार होत्या. त्यावेळी मतदानासाठी त्या एक रुपयाही घेत नसत. आता मात्र मतदार पैसे घेतल्याशिवाय मतदानालाच जात नाहीत, अशी परिस्थिती आहे. सिटी पोस्ट वॉर्डात 15 गल्ल्यांचा समावेश होता. त्यामुळे निवडणूक लढविताना आम्हा प्रत्येक गल्लीतला एक मान्यवर प्रतिनिधी घेऊन 15 लोकांची निवडणूक कमिटी तयार केली होती. रोज संध्याकाळी आमची मीटिंग होत असे. त्यामध्ये दुसऱ्या दिवशी काय करायचे याचे नियोजन करण्यात येत असे. मतदानाला दोनच दिवस शिल्लक असताना झालेल्या अशा एका मीटिंगमध्ये दोन गल्लीतील प्रतिनिधीनी सुचविले की, अमूक एका गल्लीत पैसे वाटल्याशिवाय मत द्यायचे नाही, असे ठरले आहे, त्यामुळे आपणही तेथे पैसे वाटूया. त्यावेळी एका मताला पाच रुपये देण्यात येत होते. दोन लोकांनी मांडलेला हा प्रस्ताव अन्य तेरा जणांनी फेटाळला. त्यास कडाडून विरोध करताना आपण हा मार्ग अवलंबला तर संपूर्ण निवडणूक फिरवण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यावेळी प्रत्येक चौकातील प्रमुखाच्या शब्दाला विशेष मान होता. त्यांनी मला मतासाठी एक रुपयाही खर्च करू दिला नाही, तरीही पाचशे मतांनी मी विजयी झालो. नंतर झालेल्या निवडणुकांतही मी चढत्या क्रमाने विजयी होत गेलो. दुसऱ्या निवडणुकीत 1500 मतांच्या, तर तिसऱ्या निवडणुकीत 5400 मतांच्या फरकाने मी विजयी झालो.
त्याकाळी कार्यकर्ते उमेदवारासाठी स्वयंस्फूर्तपणे काम करत असत. प्रचारासाठी बोळांमध्ये, चौकाचौकात चांदण्या लावण्याची पद्धत होती. ढमढेरे बोळातील धक्क्या मारुती मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही अशी चांदणी लावावीशी वाटली. त्या सगळ्यांनी दोन-दोन रुपये वर्गणी काढली आणि चांदणी लावली. आता स्वखर्चाने काम करणारे असे कार्यकर्ते शोधूनही सापडणार नाहीत. वॉर्डात शांतीलाल सुरतवाला यांना विजयी करा, असे आवाहन करणारे 15-20 बोर्ड लागले होते. त्या एकाही बोर्डाचे पैसे कोणी माझ्याकडून घेतले नव्हते. निवडणुकीचा आमचा माणशी खर्च फक्त एक रुपया इतकाच होता.
माझी मातृभाषा गुजराथी, मी सधन कुटुंबातला. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांना असे वाटे की, केवळ लुटण्यासाठीच मला उभे केले गेले आहे. परिणामी निवडणुकीसाठी त्यांनी घरातून मला एकही रुपया दिला नाही. अशा परिस्थितीतही निवडणूक जिंकायचा निश्चय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे निवडणूक खर्चाची तरतूद करण्यासाठी त्यांनी पाच रुपये वर्गणीची पावती पुस्तके छापली आणि वॉर्डातून तसेच बाहेरील ओळखीच्या लोकांकडून पाच रुपयांप्रमाणे वर्गणी गोळा केली. अख्खी निवडणूक त्यांनी वर्गणीतून गोळा झालेल्या पैशावर लढविली. मात्र, या निवडणुकीनंतर निघालेल्या मिरवणुकीत माझे मोठे बंधू उत्साहाने सहभागी झाले. खूष होऊन पार्टी करण्यासाठी कार्यकर्त्यांना त्यांनी दहा हजार रुपये दिले होते.
पाच वर्षांत मी एवढे काम केले होते की, दुसऱ्या निवडणुकीत मला प्रचारासाठी घराबाहेर पडण्याचीही गरज भासली नाही. कामामुळे वॉर्डातील घराघरात मी पोहोचलो होतो. त्यामुळे 1500 मतांनी मी निवडून आलो. तिसऱ्या निवडणुकीसाठी तर माझ्या विरुद्ध उभे राह्यलाही कोणी तयार नव्हते. परंतु, राजकीय विरोधकांनी बळेबळेच विजय मारटकर यांना उभे केले. 9000 मतदारसंख्या असलेल्या वॉर्डात 5400 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला.
पवार साहेबांनी मला महापौर केले !
माझ्या राजकीय वाटचालीत पक्षाकडे मी कधीही काहीही मागितले नाही. मात्र, शरद पवार साहेबांनी स्वतः पुढाकार घेत मला महापौर केले. महापौरपद मिळविण्यासाठी तेव्हा विजयी नगरसेवक आणि पक्षाचे नेते अशा दोन्ही आघाड्यांवर फिल्डिंग लावावी लागे. तिसऱ्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर रात्री खासदार सुरेश कलमाडींच्या घरी सर्व विजयी उमेदवारांची मीटिंग बोलावण्यात आली होती. त्यावेळी निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. कोणत्या अपक्षांना पक्षात घ्यायचे यावरही चर्चा झाली. मीटिंग आटोपून घरी जाऊन झोपण्याच्या तयारीत असतानाच पवार साहेबांचा मला फोन आला. ते म्हणाले, ‘शांतीलाल, तुला महापौर करायचे ठरविले आहे, कोणाच्याही हाता-पाया पडायला जाऊ नकोस.’ घरबसल्या उमेदवारी मिळणारा व शंभर टक्के फुकट महापौर होणारा पुण्यातील मी कदाचित पहिलाच महापौर असेल.
रस्ते धुण्याच्या कल्पनेला नागरिकांचा विरोध
शहरातील प्रमुख 12 रस्ते दरमहा धुण्याची कल्पना मी महापौर असताना मांडली होती. परंतु नागरिकांनी तिला विरोध केला. राज्यात दुष्काळ असताना शहरात रस्ते धुण्यासाठी पाणी वापरणे ही कल्पना नागरिकांना रुचली नाही. या योजनेमुळे प्रदूषण नियंत्रणाबरोबरच वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटला असता. या योजनेसाठी कात्रज तलावाचे पाणी वापरण्यात येणार होते. रस्ते धुण्यापूर्वी त्यावरील खड्डे बुजविण्यात येणार होते. खड्डेरहित रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी टळली असती तर रस्ते धुण्यामुळे धुळीने होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसला असता. माझी ही कल्पना नंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात राबविली होती.