

पुणे : पूर्वीच्या वादातून एका युवकावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चंदननगर भागातील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात शनिवारी (दि.६) सायंकाळी घडली. हल्लेखोरांनी युवकाबरोबर असलेल्या एका मित्रावर वार केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर चंदननगर भागात घबराट उडाली.
लखन बाळू सकट (वय १८, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात सकटचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लखन सकट आणि त्याचा मित्र शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास चंदननगरमधील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात थांबले होते. त्यावेळी हल्लेखोर तेथे आले. हल्लेखोरांनी लखन आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना शिवीगाळ केली. दोघांना मारहाण केली. त्यानंतर लखन याच्यावर चाकूने वार केले. लखन याचा मित्र देखील या हल्ल्यात जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या लखन आणि त्याच्या मित्राला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान लखन याचा मृत्यू झाला. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असून, वैमनस्यातून खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.