Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2025 Pudhari
पुणे

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2025: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा सुरेल समारोप; दिग्गजांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

पं. व्यंकटेशकुमार, डॉ. एल. शंकर आणि किराणा घराण्याच्या ‘अर्घ्य’ने ७१वा महोत्सव ठरला संस्मरणीय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पं. उपेंद्र भट यांची अनुभवसंपन्न गायकी, श्रृती विश्वकर्मा मराठे यांचे सुमधुर गायन आणि युवा गायक अनिरुद्ध ऐताळ यांच्या कर्नाटकी संगीत शैलीतील गायनाने 71 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सुरेल रंग भरलेच. पण, उत्तरार्ध गाजला तो तितक्याच दमदार सादरीकरणांनी. सावनी शेंडे यांचा स्वराविष्कार आणि डॉ. एल. शंकर यांच्या डबल व्हायोलिन वादनाच्या आगळ्यावेगळ्या नादानुभवाने वेगळा श्रवणानंद रसिकांना दिला. तर पं. व्यंकटेश कुमार यांच्या अभिजात गायकीने रसिकांची मने जिंकली. त्यानंतर किराणा घराण्याच्या गायकांनी सादर केलेल्या ‌‘अर्घ्य‌’ या कार्यक्रमाने महोत्सवाचा शेवटचा दिवस संस्मरणीय बनला. परंपरेप्रमाणे सवाई गंधर्व यांच्या आवाजातील भैरवीची ध्वनिमुद्रिका ऐकवून महोत्सवाची सांगता झाली.

आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मुकुंदनगरमधील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात आयोजित केला होता. अद्वितीय कलाविष्कारांनी शेवटचा दिवस रंगला. महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवाच्या पाचव्या दिवसाची सुरुवात ज्येष्ठ गायक पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने झाली. पं. भट यांनी गायनाची सुरुवात राग कोमल रिषभ आसावरी मधील ‌‘सबही मेरा होत...‌’ या विलंबित एकतालातील रचनेने केली. ‌‘मै तो तुमरो दासी...‌’ ही रचना सादर केल्यानंतर हिंडोलबहार रागातील ‌‘कोयलिया बोले चली जात...‌’ ही बंदिश त्यांनी प्रस्तुत केली.

त्यानंतर स्वरमंचावर आगमन झाले ते गायिका श्रृती विश्वकर्मा मराठे यांचे. त्यांनी राग पटदीपमधील ‌‘नैया मोरी पार...‌’ ही त्रितालातील बंदिश आणि त्याला जोडून ‌‘जागे मोरे भाग महाराज...‌’ या बंदिशीतून रागरूप समर्थपणे मांडले. या दोन्ही बंदिशी श्रृती यांच्याच होत्या. पाठोपाठ द्रूत एकलातील ‌‘तानुम तनन तदरे दानी...‌’ हा तराणाही त्यांनी पेश केला. ‌‘निर्भय निर्गुण...‌’ या संत कबीर यांच्या निर्गुणी भजनाने श्रृती यांनी समारोप केला. पूर्वार्ध गाजला तो यावर्षीच्या सवाईच्या स्वरमंचावरील सर्वात तरुण गायक अनिरुद्ध ऐताळ यांच्या सादरीकरणाने. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यांनी राग मुलतानीमधील ‌‘एरी बात ना माने...‌’ या विलंबित एकतालातील रचनेने सुरुवात केली. अतिशय शांत, संथ आलापीतून राग उलगडत नेला. ‌‘साहेब झमाल...‌’ या रचनेतून रागाची परिपूर्ण मांडणी समोर आली. ‌‘लागी लागी रे सावरिया...‌’ या द्रूत त्रितालातील रचनेतून आणि ‌‘नैननमे आनबान...‌’ यातून अनिरुद्ध यांचे गायन अतिशय प्रभावी ठरले. ‌‘मोक्षसदना मोह हरणा...‌’ हे कन्नड रंगगीत (परवशता पाश दैवे, या नाट्यपदासारखे) अतिशय ढंगदारपणे सादर करून अनिरुद्ध यांनी दाद मिळवली. पहाडी, पिलू यांचे हे मिश्रण पकड घेणारे ठरले. किरवाणी रागावर आधारित भक्तिरसपूर्ण रचनेने त्यांनी समारोप केला.

उत्तरार्धात गायिका सावनी शेंडे यांनी राग मारवा सादर केला. विलंबित एकतालातील ‌‘गुरुनाम का सुमिरन करिए...‌’ या रचनेतून तसेच ‌‘सपतसूरन मे परमेश्वररूप...‌’ या मध्यलय त्रितालातील बंदिशीतून सावनी यांनी रागरूप स्पष्ट केले. सायंकालीन वातावरणाशी जवळीक साधणाऱ्या मारवा रागाचे स्वरभावरूप त्यांनी गायनातून उभे केले. त्यानंतर पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांची ‌‘हो गुनियन मिल गावो बजावोः‌’ बंदिश एकतालात सादर करत, मिश्र मारुबिहाग रागातील डॉ. संजीव शेंडे रचित ‌‘मतवाले बलमा...‌’ हा दादरा पेश करून वेगळी वातावरण निर्मिती केली. ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एल. शंकर यांचे व्हायोलीन वादन रसिकांची दाद मिळवून गेले. दोन नेकचे डबल व्हायोलिन वादन असल्याने या वादनाविषयी रसिकांनाही उत्सुकता होती. त्यांनी दाक्षिणात्य संगीतातील हरीकांबोजी राग सादर केला, ज्याचे हिंदुस्थानी संगीतातील राग झिंझोटीशी साम्य आहे. रागम, तालम, पल्लवी या क्रमाने त्यांनी सादरीकरण केले. सव्वानऊ मात्रांमध्ये केलेले हे वादन झाल्यावर त्यांनी राग गौरीमनोहारी मधील रचना पेश करून विराम घेतला. यानंतर ज्येष्ठ गायक पं. व्यंकटेशकुमार यांच्या प्रगल्भ आणि दमदार गायनाने एक स्वरस्मरणीय अनुभव

रसिकांना दिला. विलंबित एकतालातील ‌‘फूलन की हरवा...‌’ या रचनेतून आणि ‌‘गजरे बनकर आई...‌’ या द्रूत त्रितालातील बंदिशीतून पं. व्यंकटेशकुमार यांनी स्वरमंडप जणू पूरियामय केला. त्यानंतर त्यांनी राग केदार मधील ‌‘झनकार परी...‌’ ही तिलवाडा मधील रचना, तसेच ‌‘कान्हा रे नंदनंदन...‌’ ही त्रितालातील बंदिश, रामदासी मल्हार रागातील ‌‘बादरवा गहर आये...‌’ ही त्रितालातील रचना, रसिकांच्या आग््राहाखातर तीन भक्तिरचना पं. व्यंकटेश कुमार यांनी ऐकवल्या. त्यांचे गायन दीर्घकाळ रसिकांच्या मनात राहील, असे रंगले. शेवटी ‌‘अर्घ्य‌’ हा कार्यक्रम किराणा घराण्याच्या गायकांनी सादर केला. त्यात पं. उपेंद्र भट, श्रीनिवास जोशी, आनंद भाटे आणि विराज जोशी यांचे गायन झाले. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांच्या कार्याचा गौरव

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार मागील आठ दशकांहून अधिक काळ कलाकारांच्या चार पिढ्यांना टाळसंगत करणाऱ्या ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांना प्रदान करण्यात आला. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मूळगुंद, मिलिंद देशपांडे, डॉ. प्रभाकर देशपांडे आणि आनंद भाटे आदी उपस्थित होते. वयाच्या शंभरीत पदार्पण करत असलेल्या टाकळकर यांना त्यांच्या सांगीतिक कार्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT