सासवड: परंपरागत शेतीला आधुनिक संशोधनाची जोड दिल्यास भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे आंबळे (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी जयेश दरेकर यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी सव्वा एकर क्षेत्रातील पपई पिकातून 8 ते 10 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. दरेकर यांनी 960 झाडांतून आतापर्यंत 36 टन पपई काढली आहे. त्यास 14 ते 29 रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. त्यांना आणखी 4 ते 5 टन उत्पादनाची अपेक्षा आहे.
योग्य वाणांची निवड, शास्त्रीय खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, मल्चिंग, वेळेवर कीड-रोग नियंत्रण आणि सातत्यपूर्ण निरीक्षण हे महत्त्वाचे घटक ठरल्याचे दरेकर सांगतात. त्यांनी मध्यम आकाराचे, अधिक गोडीचे आणि व्हायरसचा प्रादुर्भाव कमी असलेले वाण निवडले. संपूर्ण काळात शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला.
पूर्व मशागत करताना नांगरणी-रोटरणी, शेणखत, ठिबक सिंचन व मल्चिंग करून जळगाव येथून आणलेल्या दर्जेदार रोपांची लागवड करण्यात आली. रोग नियंत्रणासाठी 16 फवारण्या व 13 आळवण्या करण्यात आल्या.
विविध बुरशी, कीडनाशक औषधांचा योग्य वापर करून भरघोस उत्पादन कसे मिळेल याचे नियोजन केले. आपला अनुभव इतर शेतकऱ्यांनाही ते डिजिटल माध्यमातून सांगत आहेत. खर्च-उत्पन्नाचे गणित, तंत्रज्ञान व प्रत्यक्ष अनुभव ते शेअर करत आहेत.
अनेक शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनामुळे पपई शेतीकडे वळत आहेत. योग्य नियोजन, अभ्यास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती नक्कीच नफ्याची ठरू शकते. तरुणांनी शेतीकडे उद्योग म्हणून पाहावे, असे जयेश दरेकर यांनी आवाहन केले आहे.