Sassoon Hospital Cardiology OPD Pudhari
पुणे

Sassoon Hospital Cardiology OPD: ससूनच्या हृदयरोग ओपीडीत रुग्णांची गर्दी; तपासणीसाठी तासन्‌तास प्रतीक्षा

आठवड्यातून केवळ एक दिवस तपासणी; प्रवेशद्वारापर्यंत रांगा, ओपीडीचे विकेंद्रीकरण आणि डिजिटल नोंदणीची रुग्णांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

विनय पुराणिक

पुणे: हृदयाचे ठोके नियमित किंवा अनियमित होत आहेत किंवा नाही, याचे केवळ निदान करण्यासाठी देखील रुग्णांना मात्र डॉक्टरांच्या भेटीसाठी तासन्‌ तास ताटकळावे लागत असल्याचे चित्र ससून रुग्णालयात मंगळवारी दृष्टीस पडले. रुग्णालयातील हृदयरोग विभागाची बाह्यरुग्ण तपासणी आठवड्यातून केवळ एक दिवस होत असल्याने या दिवशी रुग्णांची मोठी गर्दी उसळत आहे. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची रांग थेट प्रवेशद्वारापर्यंत पोहचल्याने अनेकांना उन्हातच उभे राहावे लागते.

त्यातच रुग्णालयातील तळमजल्यावरील बाह्य रुग्ण विभागातील इमारतीचे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना एका बाजूला केसपेपर आणि बाह्यरुग्ण विभागाच्या खिडक्यांवर गर्दीच गर्दी उसळल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, रुग्णालयाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित झाले आहे.

ससून रुग्णालय हे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी महत्त्वाचे उपचार केंद्र आहे. खासगी रुग्णालयांमधील महागडे उपचार परवडत नसल्याने अनेक रुग्ण ससूनचा आधार घेतात. मात्र, हृदयरोग विभागाची मर्यादित ओपीडी आणि एकाच दिवशी होणारी गर्दी यामुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दूरवरून आलेल्या रुग्णांना तपासणीसाठी प्रतीक्षा करावी लागते. काही रुग्णांना पुढील तपासणी किंवा उपचारांसाठी पुन्हा रुग्णालयात यावे लागते. ससूनमधील गर्दीचा प्रश्न नवा नाही.

यापूर्वीही बाह्यरुग्ण विभागातील रांगा आणि रुग्णालयातील आठ मंजूर अतिविशेषज्ज्ञ पदांपैकी ठराविकच पदे भरल्याने मनुष्यबळाची कमतरता भासून येत आहे. दरम्यान, ससूनमध्ये हृदयविकारावरील उपचारांचा भारही वाढत आहे. रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, २०२३ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत सहा हजारांहून अधिक रुग्णांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि अन्य हृदयविकारविषयक उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ओपीडीची उपलब्धता वाढविण्याची गरज आहे, असे काही डॉक्टर खासगीत सांगतात.

गर्दीचे नियोजन महत्त्वाचे

हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वेळेवर निदान आणि उपचार महत्त्वाचे असतात. छातीत दुखणे, धाप लागणे किंवा अचानक घाम येणे, अशी लक्षणे आढळल्यास विलंब न करता वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असल्याचे हृदयरोगतज्ज्ञ सांगतात. अशा परिस्थितीत नियमित तपासणीसाठीही रुग्णांना एकाच दिवसावर अवलंबून राहावे लागत असेल, तर ही बाब गंभीर आहे. हृदयरोग विभागाची ओपीडी अधिक दिवस सुरू ठेवणे, अतिरिक्त तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करणे आणि गर्दीचे नियोजन करणे, अशी मागणी होत आहे.

ससूनमधील ओपीडीचे विकेंद्रीकरण आणि डिजिटल नोंदणी करावी. जेणेकरून रुग्णांचा ताण कमी होईल. एकाच दिवशी सर्व रुग्णांना बोलावण्याऐवजी नियोजनबद्ध वेळापत्रकानुसार रुग्णांची उपस्थिती दर्शवून सुलभ उपचार, निदान सेवा मिळेल.
श्रीकांत पवार, रुग्ण
हृदयविकाराच्या रुग्णांना कमी अन् नाममात्र शुल्कात मोफत उपचार उपलब्ध होत आहे. दिवसेंदिवस हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, दिवसभरातून चार ते पाच रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे प्राथमिक आणि नियमित तपासणीसाठी आठवड्यातून एक दिवस बाह्यरुग्ण विभागाचे नियोजन केले आहे. त्यानुसार पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध करण्यात आले आहे.
डॉ. राजेश कार्यकर्ते, प्रभारी अधिष्ठाता, ससून रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT