Pune Water Supply: पुण्याच्या पाणीटंचाईवर तोडगा शोधण्यासाठी महापालिकेची मुख्यमंत्र्यांकडे धाव; मुळशीतून ५ टीएमसी पाण्याची मागणी

२० नोव्हेंबरच्या बैठकीत वाढीव पाणीकोट्याचा प्रस्ताव; सध्या १३ टक्के पाणीकपात, जलसंपदा विभागाकडून हिशेब मागण्याची नागरिक मंचाची मागणी
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्याची पाण्याची गरज २१ टीएमसीच्या पुढे गेली असताना उपलब्ध कोटा मात्र अपुरा पडत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी मुळशी धरणातून पाच टीएमसी वाढीव पाणी मिळावे, अशी मागणी महापालिका मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. पुणे महानगर क्षेत्रातील पाणी नियोजनावर येत्या दि. २० नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.

Water Supply
Alandi Kartiki Yatra 2026: आळंदीच्या कार्तिकी यात्रेसाठी प्रशासन सज्ज; १ हजार मोबाईल टॉयलेट, १८० सीसीटीव्हींचे नियोजन

दुष्काळी परिस्थितीमुळे पाटबंधारे विभागाकडून थेट शहराच्या पाणीपुरवठ्याला कात्री लावण्यात आल्याने पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने जलसंपदा विभागाकडे सन २०२५-२६ या वर्षासाठी २१.०३ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात मात्र, पाटबंधारे विभागाने महापालिकेला केवळ १६ टीएमसी पाणीसाठा मंजूर केला. त्यात खडकवासला, पवना आणि भामा आसखेड धरणांतून मिळणारा मंजूर पाणीकोटा १४.६१ टीएमसी आहे. समाविष्ट गावांसाठीचा १.७५ टीएमसी पाणीकोटा महापालिकेकडे वर्ग करण्या बाबत जलसंपदा विभागाने कळविले असले, तरी त्याचा मंजूर कोट्यात समावेश केला जात नसल्याची तक्रार महापालिकेने केली आहे.

Water Supply
Haveli Crop Loss Panchnama: सिंहगड-पश्चिम हवेलीतील शेतकऱ्यांचे पीक नुकसान पंचनामे ग्रामपंचायतीतच धूळखात!

पाणीकपात वाढविण्याआधी जलसंपदाकडून हिशेब मागा

खडकवासला धरणसाखळीत आजही ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक असताना पुणेकरांवर अतिरिक्त पाणीकपात लादण्यापूर्वी जलसंपदा विभागाकडून पाणीवाटपाचा संपूर्ण हिशेब मागवावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी शहरातील सर्व आमदार, महापौर आणि पक्षनेत्यांकडे केली आहे.

सध्या लागू असलेल्या १३ टक्के पाणीकपातीत आणखी वाढ करण्यापूर्वी आठ महत्त्वाच्या मुद्द्यांवर जलसंपदा विभागाकडून माहिती घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जलसंपदा विभागाच्या नियमांनुसार सिंचनासाठी आवर्तन सोडण्यापूर्वी पाणी थकबाकी नसलेल्या शेतकऱ्यांकडून मागणीपत्रे घेणे आवश्यक आहे. या मागणीपत्रांच्या आधारे किती पाणी आणि किती काळ सोडायचे, याचे नियोजन कालवा समितीसमोर ठेवूनच आवर्तन सुरू करणे अपेक्षित आहे. यंदाच्या खरीप हंगामात सोडलेल्या पाच टीएमसी आणि रब्बी हंगामातील चार टीएमसी पाण्याची शेतकऱ्यांची मागणीपत्रे सादर करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Water Supply
Nira Valley Water Release: निरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिलासा; वीर धरणातून दोन्ही कालव्यांना पूर्ण क्षमतेने पाणी

खरीप आणि रब्बी हंगामात संबंधित आवर्तनातील ८५ टक्के पाणी अनुक्रमे हंगामी पिकांसाठी, तर १५ टक्के पाणी बारमाही पिकांसाठी (ऊस) वापरण्याची तरतूद आहे. उजव्या मुठा कालव्याच्या ६५ हजार हेक्टर लाभक्षेत्रात ही ८५ टक्के पिके कुठे आणि कोणती घेतली, याचा तपशीलही मागवावा. याशिवाय ही आकडेवारी कालवा समिती व जलसंपदामंत्र्यांसमोर ठेवल्याच्या निवेदनाची प्रत, कालव्यातील ४० ते ४५ टक्के गळती रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि ऑक्टोबरअखेरच्या कालवा समिती बैठकीचे इतिवृत्त उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.

संपूर्ण खरीप आवर्तनात मुंढवा जॅकवेलमधून शेतीसाठी पाणी का घेतले नाही, याचेही स्पष्टीकरण मागावे, असे वेलणकर यांनी म्हटले आहे. या जॅकवेलमधून आता दरमहा अर्धा टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याने त्याचा लाभ महापालिकेलाही मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पाणीटंचाईच्या नावाखाली पुणेकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा स्वीकारण्याची वेळ येऊ नये. राजकारण बाजूला ठेवून लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करावेत. वाढत्या महागाईत नागरिकांवर टँकरच्या पाण्याचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, असे आवाहनही वेलणकर यांनी केले आहे.

Water Supply
Sarani Dam Water Theft: सारणी बंधाऱ्यातील पाण्यावर डल्ला? वीजपंपांद्वारे अनिर्बंध उपशाचा ग्रामस्थांचा आरोप

मुळशीचा प्रस्ताव दीड वर्षापासून प्रलंबित

मुळशी धरणातून बिगर सिंचनासाठी पाच टीएमसी पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने जुलै २०२४ मध्येच प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. याशिवाय सन २०५५-५६ पर्यंतचा पाणीकोटा आरक्षित करण्याची मागणीही महापालिकेने केली आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार, २०५५ मध्ये शहराची वार्षिक पाण्याची गरज ४७.१३ टीएमसीपर्यंत पोहचणार आहे.

बोगदा आणि कालव्याचाही पर्याय

मुळशीच्या पाण्याबरोबरच खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी आणणे आणि उरुळी देवाची परिसरातील समाविष्ट गावांना कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्याचे पर्यायही मुख्यमंत्र्यांपुढे बैठकीत मांडले जाणार आहेत. दरम्यान, शहरातील जलवाहिन्यांमधून सुमारे ३५ टक्के पाणीगळती होत आहे. समान पाणीपुरवठा योजनेतून हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट आहे. प्रक्रिया केलेले ६.५ टीएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून दिले जात असल्याने मंजूर पाणीकोट्यातून ३० टक्के कपात करू नये, अशी महापालिकेची भूमिका आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरच्या बैठकीत वाढीव पाणीकोट्याच्या मागणीसह पर्यायी स्रोतांबाबत काय निर्णय होतो, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.