

आळंदी: श्रीक्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी यात्रा, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसह स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा आणि वाहतूकव्यवस्थेसाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. भाविकांसाठी सुमारे १ हजार मोबाईल टॉयलेट, ४०० अतिरिक्त सफाई कर्मचारी, १८० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ७०० सीटीपीटी सीट्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्रेपूर्वी सर्व विभागांनी आपापली कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी दिले आहेत.
यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी मंगळवारी (दि. १७) आळंदी नगरपरिषदेच्या सभागृहात दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या वेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, मुख्य विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, उपनगराध्यक्षा सुजाता कालिदास तापकीर, यात्रा व नियोजन समिती सभापती पूजा घुंडरे, पोलिस उपायुक्त मारुती जगताप, विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, गटनेते सचिन गिलबिले, नगरसेविका साक्षी कुऱ्हाडे, नगरसेवक सागर कुऱ्हाडे, नगरसेवक दिनेश घुले, नगरसेविका खुशी बोरुंदिया, नगरसेवक सोमनाथ कुऱ्हाडे, नगरसेविका अरुणा ज्ञानेश्वर घुंडरे, नगरसेवक गोविंद कुऱ्हाडे, नगरसेवक सुरेश झोंबाडे उपस्थित होते.
यात्राकाळात शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर, दर्शनबारी आणि घाट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या ठिकाणी १८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे नियंत्रण आळंदी पोलिस ठाण्यातून केले जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी ४०० बॅरिकेड, वॉचटॉवर, २४ तास पोलिस पेट्रोलिंग तसेच १ डिसेंबरपासून विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
आरोग्य सुविधांसाठी शहरात १० वैद्यकीय बूथ उभारण्यात येणार असून, ग्रामीण रुग्णालयातील ३० बेड आणि खासगी रुग्णालयांतील ४० टक्के बेड राखीव ठेवण्याचे नियोजन आहे, तसेच ११ रुग्णवाहिका, ऑक्सिजन बेड आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध केला जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी चार ठिकाणी पाणी भरणा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. वडगाव, चाकण, मरकळ व चऱ्होली रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, दर्शनबारीतील कॅटवॉक पूर्ण करणे, नदीघाटाच्या पायऱ्यांची दुरुस्ती, वाहतूक वळविण्यासाठी सात ठिकाणी व्यवस्था आणि अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. महिलांसाठी हिरकणी कक्षात ५ हजार सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे.
इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडले जाणार नाही, यासाठी संबंधित विभागांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एनडीआरएफ पथक आणि अतिरिक्त अग्निशमन वाहने उपलब्ध करण्याबाबतही चर्चा झाली. मागील यात्रांचे अनुभव लक्षात घेऊन सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी दिले.