अमृत भांडवलकर
सासवड: कऱ्हा आणि चांबळी अर्थात भोगावती या नद्यांच्या पवित्र संगमभूमीवर वसलेले श्री चांगावटेश्वर मंदिर सासवडच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाची साक्ष देते. श्री वटेश्वर म्हणूनही ओळखले जाणारे हे पुराणप्रसिद्ध, जागृत आणि स्वयंभू शिवालय भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. निसर्गरम्य परिसर, प्राचीन हेमाडपंती स्थापत्य आणि काळ्या पाषाणातील अप्रतिम शिल्पकलेमुळे मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सासवड एसटी बसस्थानकापासून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावर सासवड-किल्ले व पुरंदर-कापूरव्होळ रस्त्यालगत हिरव्यागार वृक्षराजीत हे मंदिर वसले आहे. चांगादेवांनी मंदिराची स्थापना केल्याची स्थानिक आख्यायिका आहे. सन १७०० मध्ये आबाजी पंत पुरंदरे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते.
मंदिराच्या रचनेत नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे प्रमुख भाग आहेत. नंदीमंडपातील स्तंभांवर शरभ, महिषासुरमर्दिनी, शाखामृग, नर्तक, मयूर आणि कुस्तीगिरांची शिल्पे कोरण्यात आली आहेत. विविध स्तंभांवर गेंडा, अश्व, वाघ आणि हत्तीसारख्या पशुपक्ष्यांच्या शिल्पांबरोबरच पानाफुलांची नक्षीही पाहायला मिळते. सभामंडपातील विशाल घोटीव नंदीची मूर्ती विशेष आकर्षण आहे.
गर्भगृहातील काळ्या पाषाणातील शाळुंका, पांढरी गणेशमूर्ती, तुळशीवृंदावन, दीपमाळ आणि परिसरातील अन्य धार्मिक वास्तू मंदिराचे सौंदर्य वाढवतात. मंदिराभोवतीची तटबंदी, ओवऱ्या, तीर्थकुंड तसेच कऱ्हा नदीकाठचा घाट या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात. श्री संत सोपानदेव समाधी मंदिरही जवळच आहे.
निसर्ग, इतिहास, स्थापत्य आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम असलेले चांगवटेश्वर मंदिर सासवडच्या सांस्कृतिक ओळखीतील महत्त्वाचे स्थळ आहे. भाविकांसह इतिहास, वास्तुकला व शिल्पकलेची आवड असलेल्या पर्यटकांनीही या मंदिराला आवर्जून भेट द्यावी.
कसे पोहचाल?
पुणे, हडपसर व परिसरातून सासवडला पीएमपीएमएल आणि एसटी बसची सुविधा उपलब्ध आहे. सासवड बसस्थानकापासून मंदिर सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. खासगी वाहनानेही मंदिरापर्यंत जाता येते.