Pune Ganeshotsav DJ: डीजेला विरोध नाही; कर्णकर्कश आवाजाला आळा घाला! गणेश मंडळांचा एकमुखी सूर

‘मोठ्या आवाजाची नव्हे, शिस्तीची स्पर्धा व्हावी’; प्रेशर मीड, प्लाझ्मावर नियंत्रणाची मागणी, सरसकट बंदीला साउंड व्यावसायिकांचा विरोध
Ganeshotsav
GaneshotsavPudhari
Published on
Updated on

पुणे: 'ध्वनिव्यवस्थेला (डीजे) विरोध नाही; पण आवाज मर्यादेत हवा', 'मोठ्या आवाजाची नव्हे, शिस्तीची स्पर्धा व्हावी', 'प्रेशर मीड, प्लाझ्मासारख्या कर्णकर्कश ध्वनियंत्रणाला आळा घालावा' आणि 'सरसकट बंदीऐवजी नियमबद्ध ध्वनिव्यवस्थेला परवानगी द्यावी', असा एकमुखी सूर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह साउंड व्यावसायिकांनी व्यक्त केला. दै. 'पुढारी'ने घेतलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ध्वनिव्यवस्था आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला.

Ganeshotsav
Pune Municipal Corporation Corruption: नगरसेवकांकडून ‘स’ यादीतील कामांसाठी २० टक्क्यांची मागणी?; ठेकेदार हवालदिल

विसर्जन मिरवणुकीत तरुणाईच्या उत्साहासाठी ध्वनिव्यवस्थेचा वापर होत असला, तरी गेल्या काही वर्षांत प्रेशर मीड आणि प्लाझ्मा या आवाजाची तीव्रता वाढविणाऱ्या उपकरणांच्या वापराची स्पर्धा वाढली आहे. यामुळे, प्रत्येक मंडळांमध्ये आवाजामुळे स्पर्धा निर्माण झाली होती. त्यावरून बरेच गुन्हे दाखल झाले आहेत. कर्णकर्कश आवाजाचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि मिरवणूक मार्गालगतच्या रहिवाशांना सहन करावा लागतो. त्यामुळे मंडळाची प्रतिष्ठा मोठ्या साउंड सिस्टिमवर नव्हे, तर मिरवणुकीतील शिस्त, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यावर ठरावी, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Ganeshotsav
Gultekdi Market Yard: गुलटेकडी मार्केट यार्ड झाले ‘चिखल यार्ड’; राडारोडा, कचरा अन् दुर्गंधीने व्यापारी-हमाल त्रस्त

साउंड व्यावसायिकांनीही प्रेशर मीड आणि प्लाझ्मा या अधिक आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांना विरोध दर्शविला. मात्र, काही जण नियम मोडतात म्हणून संपूर्ण ध्वनिव्यवस्थेवर बंदी घालू नये, अशी त्यांची भूमिका आहे. पोलिस प्रशासनाने उत्सवापूर्वीच ध्वनिमर्यादा, वेळ, स्पीकरची रचना, प्रतिबंधित उपकरणे आणि नियमभंगावरील कारवाई स्पष्ट करून सर्वांसाठी समान नियम लागू करावेत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

Ganeshotsav
Purandar Parner Peas: पुरंदर-पारनेर मटारची बाजारात एंट्री; घाऊक दर ८०० रुपयांवर, किरकोळ विक्री १४० रुपयांपर्यंत

‘ध्वनिव्यवस्थेला विरोध नाही; पण मर्यादा पाळली पाहिजे’

गणेशोत्सव हा आनंद आणि श्रद्धेचा उत्सव आहे. बदलत्या काळानुसार त्याच्या स्वरूपात बदल झाले असले, तरी पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपणे आवश्यक आहे. ध्वनिव्यवस्थेला आमचा सरसकट विरोध नाही; मात्र त्याचा आवाज मर्यादेतच असला पाहिजे.

प्रेशर मीड आणि प्लाझ्माचा वापर वाढून कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाची स्पर्धा होऊ नये. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येक मंडळाने घ्यावी. प्रशासनाने ध्वनिव्यवस्था आणि त्याला पूरक ध्वनियंत्रणाबाबत आधीच स्पष्ट नियम जाहीर करून ते सर्व मंडळांना समानपणे लागू करावेत.

सागर भोसले, माजी अध्यक्ष व समन्वयक, श्री शारदा गजानन मंडळ, मार्केट यार्ड

Ganeshotsav
Pune Fruit Market: पुणे फळबाजारात डाळिंबाची ‘बंपर’ आवक! श्रावणात मागणीही तेजीत; दर मात्र स्थिर

गणेशोत्सवात ध्वनिव्यवस्थेला मोठी मागणी असते आणि त्यावर जवळपास दोन ते तीन हजार व्यावसायिक व कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. प्रत्येक ध्वनिव्यवस्था व्यावसायिक नियम मोडतो, असा समज करणे चुकीचे आहे. प्रशासनाने आवाजाची मर्यादा, वेळ, स्पीकरची रचना आणि वापरता येणाऱ्या उपकरणांबाबत स्पष्ट नियम द्यावेत; त्यांचे पालन करण्याची आमची तयारी आहे. प्रेशर मीड आणि प्लाझ्मासारख्या तीव्र आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांना आमचाही विरोध आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर निश्चित कारवाई व्हावी; मात्र त्यासाठी संपूर्ण व्यवसायाला जबाबदार धरून सरसकट बंदी घालू नये.

राजू कांबळे, कार्याध्यक्ष, साउंड अँड लाइट असोसिएशन, पुणे

तरुणांचा उत्साह हा गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, डीजेचा आवाज किती मोठा किंवा साउंड सिस्टिम किती प्रचंड आहे, यावर मंडळाची प्रतिष्ठा ठरत नाही. सामाजिक उपक्रम, विधायक देखावे, पारंपरिक वाद्ये आणि शिस्तबद्ध उत्सवातून मंडळाची खरी ओळख निर्माण होते. ध्वनिव्यवस्था वापरायचा असल्यास न्यायालय आणि प्रशासनाने निश्चित केलेली ध्वनिमर्यादा पाळलीच पाहिजे. नागरिकांना त्रास देणाऱ्या अतिरिक्त ध्वनियंत्रणाला आळा घालावा. प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता सर्व मंडळांसाठी समान नियम लागू केल्यास उत्सव अधिक आनंददायी आणि शिस्तबद्ध होईल.

राहुल शिरोळे, माजी अध्यक्ष, श्री शिवाजीनगर गावठाण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news