Unemployment Marriage Issues Pudhari
पुणे

Rural Unemployment Marriage Issues: बेरोजगारीची बेडी; ग्रामीण तरुणांचे विवाहअडथळे वाढले

स्थिर नोकरी नसल्याने विवाह प्रस्ताव धुडकावले जात; ३०–३५ वयोगटातील तरुणांमध्ये मानसिक तणाव, चिंता वाढली

पुढारी वृत्तसेवा

काटेवाडी: ग्रामीण भागातील वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण तरुणांच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम करू लागले आहे. ‌’नोकरी नाही, म्हणून लग्न नाही‌’ अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असून, अनेक तरुण 30 ते 35 वर्षांचे झाले तरी विवाहाचा विषय काही केल्या मार्गी लागत नाही. परिणामी, ग्रामीण समाजरचनेत हा नव्या प्रकारचा सामाजिक प्रश्न डोके वर काढत आहे.

बहुतेक तरुण शेती हा एकमेव आधार मानून जीवन जगत आहेत. परंतु, मुलीच्या घरच्यांची पहिली अट ‌’स्थिर नोकरी‌’ असल्याने शेती करणाऱ्या मुलांना थेट नकाराचा सामना करावा लागत आहे. पदवीधर असूनही चांगली नोकरी मिळत नाही, कंत्राटी नोकऱ्या, कमी वेतन आणि अस्थिर कामाची परिस्थिती, यामुळे तरुणांचे भविष्य अनिश्चित बनले आहे. चांगला पगार किंवा सरकारी नोकरी नसल्यास विवाहासाठीचे प्रस्ताव लगेच बाजूला सारले जातात.

लग्नाचे वय ओलांडल्याने तरुणांमध्ये मानसिक तणाव, आत्मविश्वास कमी होणे, समाजातील टीका आणि पालकांची वाढती चिंता या समस्या तीव होत आहेत. सध्या मुलीसाठी मुलगा स्थिर नोकरी, शेती आणि भरगच्च पगार, अशी अपेक्षा वाढलेली दिसते. अशा परिस्थितीत केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेल्या मध्यम व अल्पभूधारक कुटुंबातील तरुणांना सुयोग्य वधू मिळणे कठीण झाले आहे. सधन कुटुंबातील मुलांचे लग्न तुलनेने सोपे जाते. मात्र, सामान्य वर्गातील तरुणांना लग्नाघरापर्यंतचा मार्ग अधिक कठीण बनला आहे.

ग्रामीण तरुण सक्षम, मेहनती आणि कर्तृत्ववान असतात. तरीही फक्त ‌’नोकरी नाही‌’ या एका कारणावरून त्यांना नाकारले जाते. हा विचार बदलण्याची गरज आहे. स्वभाव, कामाची तयारी, जबाबदारीची जाणीव आणि कर्तृत्व यांनाही महत्त्व दिल्यास अनेकांची घरे सुखाने नांदू शकतील.

बेरोजगारीची बेडी तुटल्याशिवाय लग्नाची जोडी जुळणे कठीण आहे. त्यासाठी समाजाचा दृष्टिकोन बदलणे, प्रशासनाने रोजगारनिर्मितीवर भर देणे आणि तरुणांनीही कौशल्यविकासाकडे लक्ष देणे, या तिन्हींच्या संयुक्त प्रयत्नांची आज अत्यंत आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT