

मोहसीन शेख
बाणेर: पाषाण, सुतारवाडीतील शिवनगरच्या मागील भागात पाषाण तलावालगत असलेल्या झाडींमध्ये बिबट्या सकाळी 10.30 वाजण्याच्या आसपास पाहावयास मिळाल्याने बिबट्या आला रे आला... पळा पळा, मागची दारे लावा... असे म्हणत लगबगीने आपल्या घराचे मागील दरवाजे लावत बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी टेरेसवर धाव घेतली.
जुन्नर, खेड, मंचर, कडूस या ग््राामीण भागातील बिबट्याच्या बातम्या ऐकता ऐकता आता तो बिबट्या शहरातील औंध, बावधन, पाषाण सुतारवाडी भागात आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे जसे पूर्वी ‘लांडगा आला रे आला’ या गोष्टीसारखीच परिस्थिती आता ’बिबट्या आला रे आला’ अशी बनली आहे. परंतु, प्रत्यक्षात हा बिबट्या कधी जेरबंद होणार, याकडे मात्र पूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. याबाबतची सक्षम पावले उचलताना प्रशासकीय वर्ग कमी पडत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
आता बिबट्या शहरात व शहरातील वस्तीजवळ येऊन पोहचला आहे. सुतारवाडी भागात शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या आसपास प्रथम तो प्रियोगी प्लाझा या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला पाहण्यास मिळाला. या वेळी तिथून जाणाऱ्या एका ट्रकचालकाने त्याला पाहिले व थांबून येथील सुरक्षारक्षकाला सांगितले. प्रियोगी प्लाझाच्या गेटवरून उडी मारताना बिबट्याचे केस त्या गेटला अडकलेले पाहावयास मिळाले.
प्रियोगी प्लाझाच्या गेटवरून उडी मारल्यानंतर बिबट्या शेजारी असलेल्या छोट्या रस्त्यावरून मानवी वस्तीकडे वळाला होता. परंतु, नंतर तो मुख्य रस्ता पार करून प्रियोगी प्लाझासमोर असलेल्या मुक्ता रेसिडेन्सी सुतारवाडीतील सीसीटीव्हीमध्ये चार वाजून बारा मिनिटांनी कैद झालेला पाहावयास मिळाला. मुक्ता रेसिडेन्सीसमोर असलेल्या जागेतून तो ऐटीत चालत जाताना सीसीटीव्हीत दिसला. त्यानंतर मात्र तो कुठे गेला, याचा ठावठिकाणा बऱ्याच कालावधीनंतरही लागला नाही. परंतु, अनेकांनी त्याला पाषाण तलावालगतच्या झाडींमध्ये पाहिल्याची माहिती समोर येत आहे. तलावालगत असलेल्या विहिरीजवळील राहायला असलेल्या सुवर्णा कवठे यांनी या भागातील दोन कुत्री एक-दोन दिवसांपासून दिसत नसल्याचेही सांगितले. यामुळे बिबट्याने आपला मोर्चा पाषाण तलावाकडे वळवल्याचे लक्षात येत आहे.
बिबट्या आढळण्याच्या बाबतीत काही ठरावीक घडामोडी
1) रात्री वाजण्याच्या आसपास पाषाण तलाव व पक्षी अभयारण्य परिसरात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज, एका सुरक्षारक्षकाने बिबट्या पाहिल्याचे सांगितले. याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले.
2) त्यानंतर प्रियोगी प्लाझातील सीसीटीव्हीमध्ये पहाटे चारच्या सुमारास कैद.
3) चार वाजून बारा मिनिटांनी मुक्ता रेसिडेन्सीसमोरून जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद.
4) सकाळी आठ वाजता पक्षी अभयारण्य जॉगिंग ट्रॅकवर एका व्यक्तीने पाहून येथील सुरक्षारक्षकाला कळविले.
5) सकाळी सव्वादहाच्या सुमारास शिवनगरमागे सुतारवाडी पाषाण तलावालगत असलेल्या विहिरीजवळ एका लहान मुलीने पाहिला.
6) दुपारी एकच्या आसपास या विहिरीजवळ असलेल्या झाडींमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाने बिबट्या पाहिला.