देहू येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि वारकरी अध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या उपोषण आणि आंदोलनात बोलताना आमदार रोहित पवार Pudhari
पुणे

Rohit Pawar: रोहित पवारांचे राज्य सरकारवर आरोप : शेतकऱ्यांना मदतीस दानत नाही

देहू येथे उपोषणात बोलताना आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका; शेतकऱ्यांच्या नुकसानावर भरपाईत दिशाभूल, पुण्याच्या प्रतिमेला गुन्हेगारीचा धबधबा

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव : सत्ता तुमच्याकडे आहे, मग शेतकऱ्यांना मदत करण्याची दानत दाखवा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. देहू येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि वारकरी अध्यात्मिक आघाडीच्यावतीने करण्यात आलेल्या उपोषण आणि आंदोलनात ते बोलत होते. या वेळी पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, माजी सरपंच रत्नमाला करंडे, संदीप शिंदे, अमित घेनंद, शंकर काळोखे, अमोल काळोखे आदी उपस्थित होते. (Latest Pune News)

सरकार मदत करण्यात अपयशी

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेती, घरे, जनावरे, शालेय साहित्य वाहून गेले आहे. अनेक कुटुंबांच्या चुली थंडावल्या असून, शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, सरकार मदत करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप पवार यांनी केला. सत्ताधारी विरोधकांवर दानत नसल्याचा आरोप करतात; पण तुमच्याकडे सत्ता आहे, मग शेतकऱ्यांना मदत करुन तुमची दानत दाखवा, असा सवाल त्यांनी केला.

भरपाईच्या नावाखाली सरकारकडून दिशाभूल

पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना म्हटले, की शेतकऱ्यांच्या दुःखावर फक्त बैठका घेऊन उपयोग नाही. काही मंत्री शेतकऱ्यांच्या गावात न जाता परत फिरले. शेतकऱ्यांना फक्त गंडवण्याचे काम चालले आहे. चाणक्यनीतीचा वापर करुन सरकारने भरपाईच्या नावाखाली केवळ दिशाभूल केली आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी पुढे म्हटले, की संत तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या डोहात कर्जाच्या वह्या बुडवून सर्वांचे कर्ज माफ केले. आज त्याच भावनेतून आम्ही तुकोबांच्या पंढरीतून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी विठ्ठल चरणी साकडे घालत आहोत.

वारकरी अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष हभप दत्तामहाराज दोन्हे यांनी संत तुकाराम महाराजांच्या कृतीचे स्मरण करत माझ्या वाट्याला संपत्ती नाही, तर समाजाला वाट दाखवणे हेच माझे ध्येय आहे, असे सांगितले. या आंदोलनाला प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यावतीने सुहास गोलांडे यांच्यासह विविध संघटनांनी लेखी पत्राद्वारे पाठिंबा दिला.

गुन्हेगारीमुळे पुण्याच्या प्रतिमेला सुरुंग

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आता बदलत आहे. जे गुंड निवडणुकीत प्रचारासाठी वापरले गेले, त्यांचाच आता सत्तेवर प्रभाव दिसतो आहे. गुन्हेगारी आणि दादागिरीने पुण्यासह महाराष्ट्र गुन्हेगारी व भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर गेला आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT