

अनिल सावळे पाटील
जळोची : दिवाळी या महत्त्वाच्या सणाला लक्ष्मीपूजन करण्यासाठी गुंडग्या, लाह्या-बत्तासे यांच्यासह घरदार साफसफाई करणारी केरसुणी ही देखील पुजली जाते. या लक्ष्मीला दिवाळीच्या कालावधीत मोठी मागणी असते. (Latest Pune News)
आधुनिक युगात व्हॅक्यूम क्लीनर व इतर साफसफाई करणारी साधने, विविध यंत्रे बाजारात उपलब्ध झाली आहेत. असे असले तरी लक्ष्मीपूजनसाठी केरसुणीचा मान पूर्वापार चालत आलेला आहे. पूर्वी जुनी घरे शेणामातीची होती. ती साफ करण्यासाठी झाडू म्हणून शिंदोळ्याच्या पानांच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या केरसुणीचा वापर केला जात होता.
या झावळ्यांच्या फांद्या तोडून वाळत घालाव्या लागतात. वाळल्यानंतर फांद्या झोडून त्यातील एकएक पान वेगळे करून पानांचा गठ्ठा बांधाला जातो. हा गठ्ठा एकत्र केल्यावर पाने तासून बारीक करून एकसारखी मुठीच्या बाजूला वळवून विशिष्ट पद्धतीने बांधली जातात. पूर्वी घायपाताच्या साहाय्याने केरसुणी बांधल्या जात. आता नायलॉन दोरीचा वापर होतो. याला खर्च मोठा होता.
सध्या शिंदोळ्यांच्या झाडांची संख्या कमी होत असल्याने केरसुणीसाठी लागणारा कच्चा मालही सहजपणे उपलब्ध होत नाही. याच कारणास्तव केरसुणीच्या किमती वाढल्या आहेत. लहान कुंच्यापासून मोठ्या झाडूच्या किमती वेगवेगळ्या आहेत. मोठी केरसुणी 100 रुपये, त्यापेक्षा लहान 80, तर कुंडले 60 ते 70 रुपयांना बाजारात उपलब्ध आहेत. गवताच्या किंवा शिंदीच्या झाडापासून केरसुणी बनवतात. महाराष्ट्रात जुन्नर तालुक्यातून पुरवठा होतो. त्याचप्रमाणे कर्नाटक व आंध प्रदेशमधूनही पुरवठा होत असतो. विविध फरशी, पेव्हर ब्लॉक स्वछता करण्यासाठी आल्याने विविध झाडू आले आहेत. परंतु, लक्ष्मीपूजनासाठी भारतीय संस्कृतीमध्ये केरसुणी अर्थातच त्या दिवशीची लक्ष्मीचे महत्त्व आजही आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये केरसुणीला महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामुळे किमती वाढल्या तरी खरेदी करीत पूजन करावे लागणार. गरीब महिला, मजूर यांना व्यवसाय मिळावा, यासाठी अत्याधुनिक साधने न वापरता ग्रामीण भागातील केरसुणी व्यावसायिकांकडून खरेदी करीत भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे.
मनीषा सुधीर शिंदे उपाध्यक्षा, जिजाऊ सेवा संघ बारामती तालुका