

पुणे : समाज माध्यमांवरून मिळणाऱ्या धमक्यांमुळे सारसबागेत बुधवारी (दि. 22 ऑक्टोबर) होणारा दिवाळी पहाट हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. पण, पोलिसांनी सुरक्षेची हमी दिल्याने पूर्वनियोजनानुसार पाडव्याच्याच दिवशी ’गोवर्धन पहाट दिवाळी’ हा कार्यक्रम सारसबागेत रंगणार आहे.(Latest Pune News)
गेल्या 28 वर्षांपासून पुणेकरांसाठी विनामूल्य सादर होणारा हा दिवाळी पहाट कार्यक्रम यंदा नाइलाजास्तव रद्द करावा लागत असल्याचे संयोजक युवराज शहा आणि जितेंद्र भुरुक यांनी सोमवारी दुपारी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले होते. मात्र, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी याबाबत झालेल्या चर्चेनंतर हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले आहे.
शनिवारवाड्यामध्ये नमाजपठणाच्या चित्रीकरणानंतर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांतून प्रसारित झालेल्या धमक्यांच्या व्हिडीओमुळे सारसबागेतील पाडव्याला होणारा दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय शहा यांनी सोमवारी घेतला होता. मात्र पोलिसांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी कार्यक्रमाला सुरक्षेची हमी दिली. त्यामुळे कार्यक्रम पूर्वनियोजित वेळेनुसार होणार आहे, असे शहा यांनी सांगितले.
यंदाचा गोवर्धन दिवाळी पहाट कार्यक्रम पहाटे पाच वाजता सारसबागेत होणार आहे. ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद यांच्या सन्मानार्थ ’एक प्यार का नगमा है...’ ही गीतांची मैफल रसिकांना ऐकायला मिळणार आहे. गायक जितेंद्र भुरुक आणि सहकलाकार ही गीते सादर करणार आहेत. युवराज शहा, स्वतंत्र थिएटर, सॅटर्डे क्लबतर्फे हा कार्यक्रम रंगणार आहे.