

खोर : आज मंगळवारी दि. 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असल्याने दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात दिवाळी सणाची लगबग चांगलीच रंगली आहे. संपत्तीची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी आणि धनसमृद्धीचे प्रतीक कुबेर यांचे पूजन घराघरांत मोठ्या भक्तिभावाने करण्यात येणार आहे.(Latest Pune News)
दरवर्षीप्रमाणे यंदाही घराघरांत मांदियाळी, दिव्यांचा उजेड, रांगोळीचा सडा आणि पारंपरिक फराळाच्या खमंग सुवासाने सणाचे मंगल वातावरण अनुभवास येत आहे. गावोगावी बाजारपेठा रोषणाईने उजळल्या असून, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. सुवासिक अगरबत्त्या, फुलांची तोरणे, पारंपरिक पोशाख, दिवे आणि सजावटीच्या वस्तूंची विक्री जोरात सुरू आहे. व्यापारीवर्गातही या सणामुळे उत्साहाचे वातावरण आहे.
महिला भगिनी फराळाच्या तयारीत गुंतल्या आहेत, तर लहान मुले आकर्षक किल्ले आणि सजावट करण्यात रमली आहेत. दिवाळीच्या या मंगल क्षणी सर्वत्र आनंद, उत्साह आणि ऐक्याचा माहौल दिसत आहे
घरासमोर महिलांकडून रंगबिरंगी रांगोळ्या काढल्या जात आहेत, दिव्यांच्या प्रकाशात घरे उजळून निघाली आहेत, तर घराघरांत गोडधोड फराळाचे पदार्थ तयार होत आहेत. मुले आणि तरुणाई फटाक्यांच्या आतषबाजीत आनंद साजरा करीत आहेत. लक्ष्मीपूजनाचा हा दिवस केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून, कुटुंबीय व मित्रमंडळींना एकत्र आणणारा, प्रेम आणि ऐक्याची भावना दृढ करणारा असा सण ठरतो. यानिमित्त सर्वत्र सुखसमृद्धी, शांती आणि आनंद लाभावा, अशी प्रार्थना केली जात आहे.
लक्ष्मीपूजनासाठीचा शुभ कालावधी संध्याकाळी 6.52 ते रात्री 8.48 असा 1 तास 56 मिनिटांचा असून, या वेळेत देवी लक्ष्मी व कुबेराचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. घर, दुकाने आणि कार्यालयांमध्ये विशेष सजावट व पूजनाची तयारी करण्यात आली आहे.