शिरूर: अष्टविनायकांपैकी एक असलेले रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील महागणतीचे मंदिर 15 एप्रिल ते 31 जुलै 2026 या काळात देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. याबाबत सहायक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनीही आदेश जारी केले आहेत.
अष्टविनायक आराखड्यांतर्गत महाराष्ट्र शासनाने जतन व दुरुस्तीकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पुरातत्त्व विभागामार्फत या मंदिरांच्या संवर्धनाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे दुरुस्तीची कामे सुरू आहेत. सध्या मुख्य मंदिर, तसेच परिसरातील कामे प्रगतिपथावर आहेत.
या अनुषंगाने देवस्थान समितीने मंदिर बंद ठेवण्याचा ठराव घेतला आहे. दर्शनासाठी मंदिर बंद असले, तरी ‘श्रीं’ची नित्य पूजाअर्चा व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहतील. या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. या काळात फक्त येथील बांधकाम, दुरुस्तीची कामे करणारे अधिकारी, कामगार यांनाच प्रवेश असणार आहे.
श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथील विकासकामे ही दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. भाविकांनी व नागरिकांनी या कामांचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या वेळी पुरातत्व विभाग, पुणेचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, मुख्य विश्वस्त ओमकार देव, देवस्थानच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, रांजणगावच्या सरपंच सुवर्णा वायदंडे, ग््राामविकास अधिकारी गंगाधर देशमुख, रांजणगाव एमआयडीचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, ग््राामस्थ व इतर अधिकारी उपस्थित होते.