

पुणे: बाणेर-पाषाण लिंक रोड परिसरात जमिनीच्या वादातून तीन कुटुंबांना तब्बल 70 ते 80 बाऊन्सर्सच्या मदतीने जबरदस्तीने घराबाहेर काढत जेसीबीने त्यांची घरे पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाच ही कारवाई केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बाणेरमध्ये कोट्यवधी रुपये दर असलेली जागा बळकावण्यासाठी भूमाफिया व बिल्डरांकडून गुंडगिरीचा अवलंब केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार कृष्णा बबन खवळे यांनी पोलिस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत बिल्डर्स कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी तसेच अभिषेक, अभिजित आणि शिवराज केदारी यांची नावे नमूद केली आहेत. दि. 9 एप्रिल रोजी सायंकाळी आरोपी 70 ते 80 बाऊन्सर्स, कामगार आणि जेसीबीसह जागेवर आले. त्यांनी घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केली आणि घराचा काही भाग पाडत कुटुंबीयांना बाहेर हाकलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आम्ही गेल्या 25 वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असून, या कारवाईमुळे महिला, लहान मुले आणि आजारी वृद्धांच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याचा दावा खवळे कुटुंबांनी केला आहे. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतरही बाणेर पोलिसांनी एफआयआर नोंदविण्याऐवजी केवळ एनसी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत बिल्डर्स वाणी यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
25 वर्षे राहतो ती घरे अचानक केली बिल्डरने जमीनदोस्त
‘न्यायासाठी आम्ही भटकत आहोत; मात्र, आमची दखल घेतली जात नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘प्रकरण न्यायप्रवीष्ट असताना आणि आम्ही गेली 25 वर्षे येथे राहत असताना बिल्डर कैलास वाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक जेसीबी आणून आमचे घर पाडले. ही कारवाई अन्यायकारक आहे,’ अशी प्रतिक्रिया तक्रारदार खवळे यांनी दिली.
पोलिस म्हणताहेत, तक्रार अर्ज मिळालेत; चौकशी सुरू आहे
या प्रकरणात बोलताना पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाशी आलेल्या सर्व तक्रारदारांचे तक्रार अर्ज घेतले आहेत. याबाबत चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुरू आहे. चौकशीनंतर योग्य कारवाई केली जाईल. त्यामुळे पोलिस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.