Leopard Pudhari
पुणे

Rajgad Leopard Terror: राजगड घाट परिसरात बिबट्यांची दहशत; वेल्हे-राजगड तालुक्यात भीतीचे वातावरण

५० हून अधिक बिबट्यांचा वावर; शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी वन विभागाचा सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वेल्हे: रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील राजगड घाटमाथा परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजगड तालुक्यातील सिंगापूर, मोहरी-वरोती, भोर्डी, केळद, घिसर, घोल, खाणू, चांदर आदी अतिदुर्गम गावांमध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. या परिसरात बछड्यांसह 20 हून अधिक बिबटे असून, संपूर्ण राजगड तालुक्यात 50 हून अधिक बिबटे असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

बिबट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाणे धोक्याचे झाले आहे. गेल्या महिनाभरात बिबट्यांनी शेळ्या, गायी, कुत्री अशा 25हून अधिक जनावरांचा फडशा पाडल्याने गुराखी व स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसा तसेच रात्रीची गस्त सुरू केली असून, गावोगाव आणि वाड्या-वस्त्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.

पर्यटक व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आले आहे. तोरणागडाच्या पश्चिमेस, रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील अतिदुर्गम सिंगापूर व मोहरी परिसरात रविवारी (दि. 4) एका बिबट्याने ठाण मांडल्याने शेतकऱ्यांत घबराट पसरली. माहिती मिळताच राजगड वन विभागाच्या वनपरिमंडल अधिकारी मंजूषा घुगे, वनरक्षक सुनील होलगीर व निखिल रासकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले. सिंगापूर येथील दगडू महिपती मोरे, धनगरवस्तीतील कोंडीबा म्हाळू कचरे तसेच परिसरातील अन्य शेतकऱ्यांची जनावरे बिबट्यांनी ठार केली आहेत. यापैकी काही शेतकऱ्यांना शासन नियमांनुसार नुकसानभरपाई देण्यात आली असून, उर्वरित प्रकरणांची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली.

वन विभागाकडून जनजागृती

दरम्यान, राजगड वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडवळे, पानशेत वन विभागाच्या वनपरिमंडल अधिकारी स्मिता अर्जुने तसेच वनरक्षक राजेंद्र निंबोरे, स्वप्निल उंबरकर यांच्या पथकाकडून तोरणा, राजगड, पानशेत-वरसगाव परिसरात जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

सह्याद्रीच्या दुर्गम वनक्षेत्रात घनदाट जंगल असल्याने बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर आहे. अलीकडे डोंगरकपात, रस्ते, प्लॉटिंग व बांधकामांमुळे बिबटे मानवी वस्तीच्या जवळ येऊ लागले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून गस्त वाढविण्यात आली असून, शाळा आणि वाड्या-वस्त्यांमध्ये जनजागृती सुरू आहे.
अनिल लांडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजगड तालुका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT