वाल्हे: पुरंदर तालुक्यातील सीताफळ हे देशभरात प्रसिद्ध आहे. पावसाळी बहार असलेला तालुक्यातील सीताफळ हंगाम सध्या अंतिम टप्प्यात असून, बुरशीमुळे सीताफळावरील चमक गेली आहे. त्यामुळे बाजारात या सीताफळाला समाधानकारक दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.
पावसातील खंड अन् बदलत्या वातावरणाचा सीताफळाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. बाजारातील सीताफळाची आवक कमी असली, तरी ढासळलेल्या गुणवत्तेमुळे बाजारातील दरही अपेक्षित मिळत नाहीत.
वाल्हे आणि परिसरात चांगल्या प्रतीच्या सीताफळांच्या २० किलो कॅरेटला २०० ते १५०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. सीताफळाला समाधानकारक दर मिळत नसल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडत आहे.
बुरशीजन्य रोगांमुळे दरावर परिणाम
पुरंदरमधील बाजारपेठेत बुरशीजन्य फळांना प्रतिकॅरेट साधारणतः २०० ते ४०० रुपये असा अत्यल्प बाजारभाव मिळत आहे. बाजारामध्ये ३० टक्के काळ्या, पांढऱ्या बुरशीजन्य फळांची आवक होते. फक्त मोठ्या आकाराची काळी फळे ही कमी बाजारभावात खरेदी केली जातात. परंतु, लहान आकाराच्या फळांना गोवा, गुजरात आणि इतर बाजारपेठांत दरच मिळत नाहीत, अशी माहिती सीताफळ व्यापारी गुणवंत राऊत यांनी दिली.
यावर्षी मान्सूनपूर्व आणि मान्सून पाऊस झाला नसल्याने तसेच बुरशीमुळे सीताफळावरील नैसर्गिक चकाकी जाऊन सीताफळे काळी पडली आहेत.संभाजी पवार, प्रगतशील सीताफळ उत्पादक