Purandar Airport Project Pudhari
पुणे

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन मोबदल्यात हेराफेरीचा आरोप; अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे ६ नोव्हेंबरला जागरण-गोंधळ आंदोलन

मोबदला वाटप प्रक्रियेच्या चौकशीची मागणी; सासवड प्रांताधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन करणार

पुढारी वृत्तसेवा

जेजुरी: पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादन व मोबदलावाटपात प्रचंड हेराफेरी होत असून, अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शासनाने या संपूर्ण प्रक्रियेची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी येत्या शुक्रवारी (दि. ६) प्रांताधिकारी कार्यालयासमोर अन्यायग्रस्त शेतकरी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन करणार आहेत. ही माहिती शेतकरी शामकांत ऊर्फ सुभाष भिंताडे, रघुनाथ कृष्णाजी कामठे, लता रघुनाथ कामठे, लक्ष्मण बाळासाहेब झुरंगे, मयूर फडतरे यांनी दिली.

पुरंदर तालुक्यात शासनाचे बहुचार्चित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. तालुक्यातील उत्तर पूर्व परिसरातील पारगाव, एखतपूर, मंजवडी, खानवडी, उदाची वाडी, कुंभारवळण, वनपुरी या गावातील जमिनीचे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. शासनाने शेतकऱ्यांना सुमारे १ कोटी ६२ लक्ष रुपयांचा घसघशीत मोबदला देऊ केला आहे.

सध्या संमतीधारक शेतकऱ्यांना मोबदलावाटपाचे काम युद्धपातळीवरून सुरू आहे; मात्र, या मोबदलावाटपात एजंटांच्या माध्यमातून मोठी हेराफेरी होत आहे. मोबदलावाटपात जाणीवपूर्वक वाद वाढवून गोंधळ निर्माण केला जात आहे. यातून अर्थपूर्ण व्यवहार केले जात आहेत. महसूल विभागाकडून यातून सर्वसामान्यांना नाहक त्रास दिला जात आहे. हक्काचा मोबदला जाणीवपूर्वक अडवला जात आहे.

तडजोड करून हा वाद वाढवून अडवणूक केली जात असून, अनेक शेतकरी वारंवार महसूल विभागाचे दरवाजे झिजवत आहेत; मात्र, न्याय मिळण्याऐवजी अक्षरशः नागवला जात असल्याचा आरोप अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा विधानसभेचे आ. नारायण पाटील यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घातले आहे. त्यांनी पत्राद्वारे येत्या हिवाळी अधिवेशनात हार्दिक प्रकार तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे, असे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शामकांत भिंताडे यांनी सांगितले.

आ. पाटील यांनी ही पुरंदर प्रांताधिकारी कार्यालयाला सन २०२३ ते २०२६ या कालावधीत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर झालेल्या अपील प्रकरणे, त्यांची सध्यस्थिती, तसेच निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांच्या निकाल व आदेशाच्या प्रती, विमानतळबाधित गावातील शेतकऱ्यांच्या वाटपाची गावनिहाय मोबदला वाटप यादी तसेच लाभार्थीनिहाय तपशील व निवाड्याच्या प्रती, प्रकल्पबाधित गावांतून प्राप्त झालेल्या तक्रारी, दावे, प्रकरणांवर करण्यात आलेली कारवाई, सद्यस्थिती तसेच निकाली प्रकरणाचे निकाल व आदेशाच्या प्रती आदींची माहिती तातडीने मागितलेली आहे. दरम्यान, अन्यायग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने येत्या ६ नोव्हेंबर रोजी सासवड येथील प्रांताधिकारी कार्यालयावर येतील, असा दावा या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT