

पुणे: केंद्रीय कृषिमूल्य आयोग (सीएसीपी) रद्द करावा, दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटरची हवाई अंतराची अट रद्द करावी, उसाची रास्त आणि किफायतशीर किमतीऐवजी (एफआरपी) पूर्वीप्रमाणेच किमान वैधानिक किमतीचा (एसएमपी) कायदा आणावा आणि साखर आयुक्तांचे नामकरण ऊस आयुक्त करण्यासह साखरेची किमान विक्री किंमत किलोस ३१ वरून ५० रुपये करावी आणि उत्पादन खर्चावर आधारित व उताऱ्यानुसार उसाला दर मिळावा आदी मागण्यांचा भडिमार राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर उद्योग प्रश्नावरील केंद्रीय अभ्यास समितीसमोर येथे केला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) केंद्राच्या अन्न मंत्रालयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तपासणी करून प्रश्नांची सोडवणूक होण्याकामी उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यास समिती गठित केली आहे. समितीचे अध्यक्ष आणि केंद्राच्या नीती आयोगाचे माजी सदस्य प्रा. रमेश चंद आणि समितीचे सदस्य, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.४) दिवसभर बैठका झाल्या. त्यामध्ये शेतकरी संघटनांच्या उपस्थितीत प्रतिनिधींनी ऊस उत्पादकांच्या प्रश्नांची सरबत्तीच केली. बैठकीस शेतकरी संघटनांच्या उपस्थित प्रतिनिधींमध्ये ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, अनिल घनवट, प्रकाश बालवडकर, ॲड. योगेश पांडे, विठ्ठल पवार, जालिंदर पाटील व अन्य शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
साखरेची एमएसपी वाढवा, एफआरपी दोन हप्त्यांत हवी
साखरेचा किमान विक्री दर न वाढविल्यामुळे आणि दुसरीकडे एफआरपीच्या दरात सतत होत असलेल्या वाढीमुळे साखर उद्योग सध्या अडचणीतून जात आहे. त्यामुळे साखरेचा सध्याचा प्रतिकिलोस असलेला किमान विक्री दर (एमएसपी) ३१ वरून ५० रुपये करण्यात यावा. तसेच उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) ऊस पुरवठ्यानंतर १४ दिवसांत देण्याचे असलेले बंधनाची मुदत वाढवून पहिला हप्ता १०.२५ टक्के उताऱ्यास ३० दिवसांपर्यंत करावा व उर्वरीत रक्कम हंगाम संपल्यानंतर महसुली उत्पन्न विभागणी (आरएसएफ) अंतिम झाल्यावर द्यावा.
म्हणजे सरळसरळ दोन हप्त्यांत एफआरपी देण्याबाबत केंद्रास शिफारस करण्याची मागण्या राज्यातील साखर उद्योगाने केंद्रीय अभ्यास समितीसमोर केल्या आहेत. व्हीएसआयमधील बैठकीस राज्यातील सहकारातील ज्येष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, संचालक राहुल घाटगे, रोहित नारा, सत्यजित जगताप, व्यवस्थापकीय संचालक अजित चौगुले, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, संचालक श्रीराम शेटे, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.
उसाची एफआरपी कशी ठरवायची, ऊस लागवड खर्च, ऊस उत्पादन खर्च, यांत्रिकीकरणातील अडचणी व उपाययोजना, उसाचे उपपदार्थनिर्मिती व भविष्यातील अन्य संधींतून शाश्वत उत्पन्नवाढ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान ऊस शेतीत वापरून उत्पादकता वाढीची संधी याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने (व्हीएसआय) केंद्रीय अभ्यास समितीस संशोधनावर आधारित साखर उद्योगाच्या विकासाचे मॉडेलबाबतचा अहवाल व त्याचे सादरीकरण पुराव्यासह देण्याच्या सूचना समितीचे अध्यक्ष प्रा. रमेश चंद यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही पुढील महिनाभरात केंद्रास तो अहवाल सादर करणार आहोत.
संभाजी कडू पाटील, महासंचालक, व्हीएसआय, मांजरी-पुणे.