School Pudhari
पुणे

Pune Zilla Parishad CBSE Schools: पुणे जिल्हा परिषदेकडून सर्व 13 तालुक्यांत CBSE शाळा सुरू करण्याचा निर्णय

खानवडीच्या धर्तीवर विस्तार; ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्हा परिषदेने पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे सुरू केलेल्या सीबीएसई शाळेच्या धर्तीवर आता जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यांमध्ये अशा शाळा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शाळांसाठी योग्य जागा शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून, येत्या वर्षभरात ठिकाणे निश्चित करण्याचा मानस आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खानवडी येथील शाळेचे उद्घाटन झाल्यानंतर तीन कंपन्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधून अशा प्रकारच्या शाळा चालविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात जागा निश्चित करताना भागीदारीसाठी योग्य संस्था किंवा कंपन्यांची निवड करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

खानवडी येथील ‌‘ज्योती सावित्री‌’ शाळेत सध्या बालवाडी ते दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळेच्या नावातील ‌‘इंटरनॅशनल‌’ शब्द वगळण्यात आला आहे. शाळेला शासनाची मान्यता मिळाली असून, ‌‘यूडीआयएस‌’ क्रमांकासाठी प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशप्रक्रियेबाबत कोणतीही तक्रार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

प्रवेशासाठी मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) तयार करण्यात आली असून, पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी ती जाहीर केली जाणार आहेत. खानवडी परिसरातील गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात येणार आहे. यासाठी अगोदर 32 गावांमध्ये सर्वेक्षण करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

सध्या बालवाडीसाठी 120 जागा उपलब्ध असून, गेल्या वर्षी 489 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी सुमारे 200 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आगामी काळात स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य देत एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT