येरवडा: ड्रेनेजलाइनच्या कामातील गंभीर निष्काळजीपणामुळे एका ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. प्रदीप लक्ष्मण परदेशी (वय ६९) असे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे. शनिवारी (दि. १७) रस्त्यावर खोदण्यात आलेल्या सुमारे १० ते १५ फूट खोल खड्ड्यात पडून ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ड्रेनेजलाईनच्या खोदकामाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेड्स, रात्रीच्या वेळी दिसतील असे इंडिकेटर आणि सूचना फलक लावणे बंधनकारक असताना केवळ प्लास्टिकचे हलके बॅरिकेड्स लावण्यात आल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वाहतूक व पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वॉर्डनही तैनात नसल्याचे समोर आले आहे. हे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असून, याबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
या दुर्घटनेमुळे पुणे महापालिकेच्या मलनि:सारण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील सर्व खोदकामांच्या ठिकाणी सुरक्षा ऑडिट करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
या घटनेनंतर नगरसेवक अविनाश साळवे, शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
अपघात झालेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी कनिष्ठ अभियंत्याला पाठविण्यात आले आहे. पाहणीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.विशाल हरिभक्त, अधीक्षक अभियंता, मलनिःसारण विभाग, महापालिका