

पौड: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त घोटावडे फाटा येथे महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. आमदार शंकर मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
या वेळी मार्गदर्शन करताना पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाचे निरीक्षक आ. विक्रांत पाटील म्हणाले की, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय नक्की आहे. महायुतीची नाळ थेट मतदारांशी जोडलेली आहे. अडचणीच्या काळात महायुतीचेच नेते धावून जातात. त्यामुळे मतदार महायुतीच्याच उमेदवाराला कौल देतील. पदवीधरांमध्ये मतदानाचा टक्का नेहमी कमी राहतो. कार्यकर्त्यांनी ही उदासीनता झटकून कामाला लागावे. महायुतीमुळे राज्य आज एक नंबरवर आहे. ‘एक जबाबदार कार्यकर्ता, दहा मते’ या सूत्राने काम केले, तर विजय निश्चित आहे. पंचायत समिती गणनिहाय नियोजन करून मतदान वाढवावे लागेल.
विधानपरिषदेचे आमदार विक्रांत पाटील, आमदार शंकर मांडेकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती अमोल नलावडे, भोरचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, मिलिंद वाळंज, विक्रम खुटवड, तानाजी मांगडे, प्रवीण जगदाळे, मुळशीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके, राजगडच्या सभापती सुवर्णा किरण राऊत, राजगड राष्ट्रवादीचे अध्यक्ष किरण राऊत, मुळशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अंकुश मोरे, भोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष घोरपडे, भोरचे उपसभापती विशाल कोंडे, राजगडचे उपसभापती संदीप खुटवड, कात्रजचे संचालक कालिदास गोपाळघरे, चंद्रकांत भिंगारे, संचालक भालचंद्र जगताप, बाबाजी शेळके, राजगड पंचायत समितीच्या सदस्या सीताताई खुळे, राजगड राष्ट्रवादी महिला अध्यक्षा कीर्तीताई देशमुख, भाजपचे मुळशी अध्यक्ष समीर मारणे, रवींद्र चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ वाघ, भारती विनोदे, बाळासाहेब गरुड, लक्ष्मण पारठे, रवींद्र कंक, संतोष धावले, सचिन मांडके, महेश वाघ, प्रवीण जगदाळे, वैशाली सणस, यशवंत धुमाळ आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार शंकर मांडेकर म्हणाले की, दहा मतदारांमागे एक पदाधिकारी नेमून मुळशी तालुक्यातून महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य देऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार मुळशीत महायुती एकत्र येऊन काम करेल. मुळशीतील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत चांगले मतदान होईल. महायुतीचा धर्म म्हणून आपण एकदिलाने काम करू.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे म्हणाले की, लोकसभेला महायुतीचे चांगले काम झाले, तर विधानसभेला महायुतीने दणदणीत विजय मिळविला. त्याच पद्धतीने पदवीधरचे पहिल्या पसंतीचे मतदान महायुतीच्या उमेदवारालाच करू आणि मुळशी तालुक्यातून मोठे मताधिक्य देऊ. सर्वांनी सहभागी होऊन दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावे. ७५ टक्के मतदान महायुतीचे उमेदवार घेतील, असा विश्वास या वेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी व्यक्त केला. महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.