Women Police Bribery Pudhari
पुणे

Pune Women Police Bribery Cases: पुण्यातील 'लेडी सिंघम'च लाचखोरीच्या जाळ्यात; तीन महिन्यांत तीन महिला पोलिस अधिकाऱ्यांना अटक

एसीबीच्या सलग कारवायांनी पोलिस दल हादरले; लाचखोरी, दरोडा आणि खंडणीप्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

अशोक मोराळे

पुणे: पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलात गेल्या तीन महिन्यांत तीन महिला पोलिस अधिकाऱ्यांना लाचप्रकरणी अटक केली आहे, तर पुणे ग्रामीण पोलिस दलातील एका महिला पोलिस हवालदारावर एक कोटीच्या दरोडाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही एका रील्सस्टार महिला पोलिस कर्मचाऱ्यावर प्राचार्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिस खात्यातील लेडी सिंघम देखील आता लाचखोरीत अव्वल असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांद्वारे स्पष्ट झाले आहे.

"मी २०१० मध्ये कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. तेव्हापासून अधिकारी होऊन समाजाला सर्वोत्तम सेवा देण्याचे माझे स्वप्न होते. पहिल्याच प्रयत्नात मी पीएसआय झाले. महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतात, हे मला दाखवायचे होते," हे शब्द आहेत २०१८ च्या बॅचमध्ये प्रथम आलेल्या चैताली गपाट या लाचखोर पोलिस अधिकाऱ्याचे. महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या ११६ व्या बॅचमध्ये पहिल्या आलेल्या गपाटला दिघी पोलिस ठाण्याच्या आवारात १५ जुलै रोजी तीन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. गेल्या साडेचार वर्षांत पुणे जिल्ह्यात वीस अधिकाऱ्यांवर लाचप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

दिघीची पीएसआय चौताली गपाट

न्यायालयात 'बी फायनल' अहवाल सादर करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पीएसआय चौताली गपाट हिला रंगेहाथ पकडले. १५ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. एका गुन्ह्याचा तपास तिच्याकडे होता. त्यात तक्रार खोटी असल्याचा 'बी फायनल' अहवाल न्यायालयात सादर करून मदत करण्यासाठी तिने आठ लाख रुपयांची मागणी केली. त्यातील तीन लाख रुपये स्वीकारताना ती एसीबीच्या जाळ्यात अडकली.

एपीआय वैशातील तोटेवार

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार हिला २८ लाखांच्या लाचप्रकरणी अटक केली. पदोन्नती झाल्याने कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर तोटेवय्ने हा उद्योग केला होता. तिने एका प्रकरणात तक्रारदाराकडेच ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. सुरुवातीलाच तिने तक्रारदाराकडून २ लाख रुपये घेतले. त्यानंतर २८ लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या प्रयत्नात ती जाळ्यात सापडली.

एपीआय ज्योती तांबे

बावधन पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक ज्योती तांबे हिच्यावर एसीबीने मे महिन्यात कारवाई केली. गुन्ह्यात मदत करणे, नातेवाइकांची अटक टाळणे आणि दोषारोपपत्र लवकर दाखल करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे तांबे हिने ५० हजार रुपयांची मागणी केली होती.

पोलिस हवालदार प्रमिला निकम

नऱ्हे येथील एक कोटीच्या दरोडा प्रकरणात राजगड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम हिच्यासह दोघा पोलिसांना सहआरोपी केले आहे. व्यावसायिकाच्या बॅगेतील २० लाख रुपयांची रक्कम तिने एका तोतया पत्रकाराच्या मदतीने काढून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

रीलस्टार सोनाली हिंगे

पोलिस दलात रीलस्टार म्हणून मिरविणाऱ्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील सोनाली हिंगे या कॉन्स्टेबलवर प्राचार्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून तिने खंडणी उकळली होती. तिला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे.

या कारणांसाठी पोलिसांकडून मागितली जाते लाच

  • गुन्हा दाखल (एफआयआर) न करण्यासाठी

  • तक्रार अर्ज स्वीकारण्यासाठी

  • तक्रारीत सौम्य कलमे लावण्यासाठी, गंभीर कलमे वगळण्यासाठी

  • आरोपीला अटक न करण्यासाठी, अटक उशिरा करण्यासाठी, कोठडी टाळण्यासाठी, तपासात नाव वगळण्यासाठी, गुन्ह्यातून निर्दोष दाखवण्यासाठी, आरोपपत्र (चार्जशीट) उशिरा दाखल करण्यासाठी

  • तपासात अनुकूल अहवाल देण्यासाठी, साक्षीदारांचे जबाब बदलविण्यास मदत करण्यासाठी

  • जप्त केलेले वाहन लवकर सोडण्यासाठी, जप्त मुद्देमाल परत देण्यासाठी, वाहतूक नियमभंगाची कारवाई टाळण्यासाठी

  • दंड न आकारण्यासाठी, मद्यधुंद वाहनचालकावर कारवाई न करण्यासाठी

  • पासपोर्ट पडताळणी लवकर करण्यासाठी, चारित्र्य पडताळणी (व्हेरिफिकेशन) जलद करण्यासाठी

  • गुन्ह्यात म्‍हणणे सादर करण्यासाठी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT