Murder Case Pudhari
पुणे

Pune Wife Murder Case: पत्नीचा खून करून अपघाती मृत्यूचा बनाव; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

पाय घसरून पडल्याचा दावा खोटा ठरला, शवविच्छेदनातून खुनाचा उलगडा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पत्नीचा खून केल्यावर पुरावे नष्ट करत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पतीला व पुरावा नष्ट करण्यास मदत करण्यांवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवी ऊर्फ वर्षा (23) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती तुषार ऊर्फ गणेश विलास तुपसौंदर्य (28, रा. 633, गंजपेठ) याच्यासह मनोज कांबळे, वनीता मनोज कांबळे यांच्यावर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 28 जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी सपोनि अनीता मधुकर तोंडे यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

खडक पोलिस ठाण्यात ऑगस्ट 2024 पासून सहायक पोलिस निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या तक्रारदार अनीता तोंडे या सध्या त्या मिठगंज पोलिस चौकीचे काम पाहतात. दि. 2 फेबुवारी रोजी त्या पोलिस ठाण्यात असताना त्यांना पोलिस हवालदार शिणगारे यांनी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास माहिती दिली. त्यांना ससून रुग्णालयातून माहिती मिळाली. त्यामध्ये 28 जानेवारी रोजी वैष्णवी तुपसौंदर्य या राहत्या घरात पाय घसरून पडल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. उपचारा दरम्यान त्यांना 2 फेबुवारी रोजी रात्री पावणेनऊ वाजता मृत घोषित केले. त्यानंतर सपोनि अनीता तोंडे या चौकशीसाठी ससून रुग्णालयात गेल्या.

तेव्हा तेथे वर्षाच्या नातेवाईकांनी तिच्या राहत्या घरात ती पाय घसरून पडल्याची माहिती डॉक्टरांना दिली. तर महिला पोलिस हवालदार प्रेमा धारूरकर यांनी पंचनामा करून या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांची कागदपत्रे प्राप्त झाली. यामध्ये मृत्यूचे कारण हे डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले होते.

याबाबत डॉक्टरांना जखमांबाबत विचारणा केली असता वर्षा यांच्या कान व डोळ्याजवळ गंभीर जखमा झालेल्या असून, ही दुखापत पाय घसरून पडून झालेली नाही. तर डोक्यात टणक वस्तूने मारहाण झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे सांगितले.

असा झाला खुनाचा उलगडा

महिलेच्या खूनप्रकरणी परिसरातील स्थानिक लोकांकडे प्राथमिक चौकशी केली असता, 28 जानेवारी रोजी वर्षाचा पती तुषारने तिला मारहाण केली असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी तेथील एका महिलेने या घटनेची माहिती पोलिस कन्ट्रोल रूमला दिली असल्याचे समजले. अधिक माहिती घेतली असता तुषारने मारहाण केल्यानंतर महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुध्द अवस्थेत पडल्याचे आढळले. या वेळी मनोज कांबळे हा दरवाजात कोणी येऊन पाहू नये याकडे लक्ष देत होता. कांबळे आणि त्याच्या पत्नीने फरशीवर पडलेले रक्त पसून टाकले. तपासात हा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT