पुणे: संपत्तीच्या वादातून पत्नीनेच पती आणि त्याच्या मैत्रिणीच्या खुनाचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोघांना संपवण्यासाठी १५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. याप्रकरणी, आंबेगाव पोलिसांनी ५० वर्षीय आरोपी पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ४९ वर्षीय पतीने फिर्याद दिली आहे. सुरुवातीला पतीने याबाबत गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे धाव घेत तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मार्च २०२६ ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
दोघांमध्ये संपत्तीवरून वाद
याबाबत बोलताना आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले, फिर्यादींचा पेट्रोल पंपाचा व्यवसाय असून, त्यांचा आरोपी पत्नीसोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू झाले.
पत्नीच्या वागणुकीमुळे त्रास होत असल्याचा आरोप करत रियाज यांनी तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. पती आपल्यापासून काही तरी लपवत असल्याच्या संशयातून पत्नीने खासगी गुप्तहेर संस्थेतील व्यक्तीला त्यांच्या मागावर लावल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मार्च २०२६ मध्ये फिर्यादी व त्यांची मैत्रिणीला संपवण्यासाठी, त्यांच्याच नात्यातील एका तरुणाला १५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. त्याला थोडे थोडे करून साडेबारा लाख रुपये देण्यात आले होते. यापूर्वी अन्य व्यक्तींना सुपारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी काम केले नसल्याने आरोपी पत्नीने त्या तरुणासोबत संपर्क केला होता.
सुपारी घेणाऱ्या तरुणाने फिर्यादीसोबत संपर्क साधला. त्यावेळी त्याने हा सर्व प्रकार त्यांना सांगितला. तसेच त्याने फिर्यादींची पत्नी आणि त्याच्यामध्ये झालेल्या मोबाईलवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग देखील ऐकवले. त्यावेळी फिर्यादींना खात्री झाली. त्यांनी हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. फिर्यादींनी याबाबत गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.