पुणे: शहरात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करताना प्रत्येक भागांत जादा दाबाने पाणी सोडण्यात येईल, त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल, असा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये हा दावा फोल ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा, अपुरा वेळ आणि काही ठिकाणी पूर्ण क्षमतेने पाणी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गेल्या आठवडाभरात महापालिकेकडे हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.
महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय जाहीर करताना वितरण व्यवस्था सक्षम असल्याचा दावा केला होता. दिवसाआड पाणी दिले जाणार असले, तरी जादा दाबामुळे कोणत्याही भागांत पाण्याची कमतरता जाणवणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, शहरातील कोथरूड, कर्वेनगर, बाणेर, खराडी, वाघोली, धानोरी, लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, सदाशिव पेठ, नारायण पेठ, वारजे, सुतारदरा, सोमेश्वरवाडीसह अनेक भागांत नागरिकांनी कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.
पाणी मिळत नसल्याने काही ठिकाणी नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, वाढत्या मागणीमुळे टँकरचे दरही वाढल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्याबरोबरच आर्थिक भारही नागरिकांवर पडत आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारींचा मोठा ओघ सुरू असल्याने अधिकारी आणि कर्मचारी तक्रार निवारणातच व्यस्त आहेत. कमी दाब, वेळेत पाणी न मिळणे, गळती आणि वितरणातील अडचणी अशा विविध स्वरूपाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नोंदवल्या जात आहेत.
दोन दिवसांत तक्रारी निकालात काढण्याचा महापालिकेचा दावा
शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने १५ ते १९ जून या पाच दिवसांच्या कालावधीत महापालिकेकडे हजाराहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी ४३७ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, ६९२ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. या सर्व तक्रारी येत्या दोन दिवसांत निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.
वॉशिंग सेंटर, बांधकामस्थळांच्या पाणीवापराकडे दुर्लक्ष
शहरात पाणीटंचाईची परिस्थिती असताना पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कार वॉशिंग सेंटर, व्यावसायिक वॉशिंग युनिट आणि बांधकामस्थळांवर तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे पुरेसा वेळ नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागातील बहुतांश कर्मचारी सध्या पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी कार्यरत आहेत. यामुळे पाण्याच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेत भरारी पथके नियुक्त केली आहेत. मात्र, या पथकांनी आजपर्यंत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात एकही दंडात्मक कारवाई केलेली नाही.
या भागातून सर्वाधिक तक्रारी
पाणीपुरवठ्यातील अडचणींच्या तक्रारी शहरातील जवळपास सर्वच पाणीपुरवठा केंद्रांतून प्राप्त झाल्या आहेत. त्यात लष्कर, एसएनडीटी जलकेंद्र कार्यक्षेत्रातील तक्रारींची संख्या सर्वाधिक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. रविवार पेठ, गणेश पेठ, सोमवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ, लक्ष्मीनगर, सुतारदरा, कोथरूड, घोले रस्ता, सोमेश्वरवाडी, खडकी, शिरोळे पथ, बाणेर, वारजे, कर्वेनगर, बोपोडी, गांधीनगर, फुलेनगर, नागपूर चाळ, कळस, धानोरी, लोहगाव, खराडी, वाघोली, विमाननगर, कल्याणीनगर आणि वडगावशेरी येथून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींचे प्राधान्याने निवारण सुरू आहे. उर्वरित तक्रारी पुढील दोन दिवसांत निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल.नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका